Sonakshi Sinha: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या नवविवाहित आयुष्याचा आनंद घेत आहे. सोनाक्षीने २३ जून रोजी सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न गाठ बांधली होती. त्यानंतर त्यांनी लग्नाचे मोठे रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला कुटुंबाव्यतिरिक्त बॉलिवूडचे अनेक स्टार्स सहभागी झाले होते. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सोनाक्षीने पती जहीर इक्बालसोबत गणेश उत्सव साजरा केल्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. पण सोनाक्षी नेहमीच या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करताना दिसते.
सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. वेगळ्या धर्माच्या जहीर इक्बालशी लग्न केल्यामुळे सोनाक्षीला सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. इतकंच नाही तर अनेक ट्रोलर्सने जहीरवर लव्ह जिहादचा आरोपही केला, यामुळे वैतागून दोघांनी लग्नाच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केलं. लग्नानंतर जहीर आणि सोनाक्षीने गणेश चतुर्थी धुमधडाक्यात साजरी केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोनाक्षी सिन्हाने रविवारी, ८ सप्टेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गणेश चतुर्थी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा पती जहीरसोबत गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे. दोघेही आरतीची थाळी धरून पूर्ण भक्तीभावाने बाप्पाची पूजा करताना दिसत आहेत. दोघांच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर सोनाक्षीने निळ्या रंगाचा हेवी लाँग सूट परिधान केला आहे. तसेच केस मोकळे सोडले आहेत. तर जहीरने सोनाक्षीला मॅचिंग डबल शेड ब्लू आणि व्हाईट कुर्ता पायजामा परिधान केला आहे.
सोनाक्षीने हा व्हिडीओ शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'जेव्हा एक जोडपे खऱ्या अर्थाने एकमेकांच्या श्रद्धांना मान्यता देतात तेव्हा प्रेमाचे रूपांतर आदरामध्ये होते. लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती' असे कॅप्शन सोनाक्षीने दिले आहे. पण हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने मुस्लीम असूनही इतर धर्माच्या विधीत तू कसा काय सहभागी होऊ शकतो? असा प्रश्न जहीरला विचारला आहे. एका यूजरने 'सोनाक्षीवर निशाणा साधत आता रमजानमध्ये रोजा धरणार का? असा प्रश्न विचारला आहे.'