बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘हीरामंडी’ स्टार सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. ती तिचा प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, तर सोनाक्षी आणि झहीर या महिन्यात म्हणजेच २३ जूनला लग्न करणार आहेत. सोनाक्षी आणि झहीर २३ जून रोजी नोंदणीकृत विवाहबंधनात अडकणार आहेत. ‘झूम’शी बोलताना सोनाक्षीच्या मैत्रिणीने सांगितले की, मला २३ जूनच्या संध्याकाळी लग्नाच्या पार्टीचे आमंत्रण मिळाले आहे. निमंत्रण पत्रिकेवर लग्नाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, "माझ्या माहितीनुसार, त्यांनी नोंदणीकृत लग्न आधीच केले आहे किंवा ते २३ जानेवारीला सकाळी करतील. पण, कोणतीही मोठा लग्नसोहळा होणार नाही, फक्त एक रिसेप्शन पार्टी होईल.’
सोनाक्षीच्या लग्नाची बातमी संजय लीला भन्साळीची वेब सीरिज ‘हीरामंडी’ रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतर आली आहे. अद्याप या लग्नाबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, पण सोनाक्षीच्या कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, या लग्नाची बातमी खरी आहे. आयुष शर्मासह अनेक स्टार्सचा या सोहळ्यात समावेश असेल. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, सोनाक्षीच्या लग्नात बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. पाहुण्यांच्या यादीत सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नातील जवळच्या मित्रांचा समावेश असेल. या जोडप्याने बॉलिवूड स्टार आयुष शर्मा, हुमा कुरेशी आणि नरुण शर्मा यांना आमंत्रित केले आहे.
याशिवाय ‘हीरामंडी’मध्ये सोनाक्षीसोबत काम करणाऱ्या स्टारकास्टचाही लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत समावेश आहे. संजय लीला भन्साळी, फरदीन खान, ताहा शाह, आदिती राव हैदरी, शर्मीन सेगल यांसारख्या अनेक स्टार्सना सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
‘झूम’सोबतच्या खास संवादात जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांची मुलगी सोनाक्षीच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ‘मी दिल्लीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी अजूनही इथेच आहे. मी अजून माझ्या मुलीसोबत याबद्दल बोललेलो नाही. तुमचा काय प्रश्न आहे की, ती लग्न करत आहे? पण, तिने मला अजून याबद्दल काहीही सांगितले नाही हे माझे उत्तर आहे. मी मीडियात जे वाचले, तेच मला माहीत आहे. जेव्हा ती माझ्याशी कशाहीबद्दल बोलते, तेव्हा माझे आशीर्वाद नेहमी तिच्या पाठीशी असतात. त्यांना जगातील सर्व सुख मिळावे, अशी आमची इच्छा आहे.’