कलाकारांना कलाविश्वास काम करत असताना अनेक वाईट अनुभवांना देखील सामोरे जावे लागते. कास्टिंग काउच सारख्या प्रकारांवर नेहमीच कलाकार बोलताना दिसतात. मात्र, काही चाहते आणि सोशल मीडिया युजर्समुळे देखील कलाकारांना अशाच प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागते. एखाद्या अभिनेत्रीला तिच्या कामावरून ट्रोल करण्याबरोबर तिच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन अश्लील मेसेज पाठवणं किंवा विचित्र मागण्या करण्याचे प्रकार देखील घडताना दिसतात. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार हिला देखील आता अशाच एका प्रसंगाला समोरं जावं लागलं आहे. सोशल मीडियाद्वारे गायत्रीने अशीच एक गोष्ट उघड केली आहे.
सोशल मीडिया जितका कलाकारांना चाहत्यांच्या जवळ आणतो, तितकाच कलाकारांसाठी तो मानसिकरित्या त्रासदायक देखील ठरतो. अभिनेत्री गायत्री दातार हिला एका सोशल मीडिया युजरने मेसेज करून अतिशय विचित्र मागणी केली आहे. अभिनेत्रीने याचा स्क्रीन शॉट काढून तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गायत्री दातार चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेतील सुबोध भावेबरोबरची गायत्रीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मोठ्या वयाच्या अभिनेत्याबरोबर रोमान्स केल्यामुळे गायत्रीला ट्रोल देखील केले गेले होते. मात्र, नंतर ही मालिका प्रेक्षकांच्या पसंती उतरली. यानंतर गायत्री दातार हिने अनेक रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला.
सध्या गायत्री कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात काम करत नसली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्टेड राहते. गायत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, तिचे स्टायलिश फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओला तुफान लाइक्स मिळतात. अनेकदा चाहते तिचं कौतुक करण्यासाठी मेसेज देखील करतात. मात्र आता एका मेसेजमुळे गायत्री दातार हिला प्रचंड संताप आला आहे. तिने थेट सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. एका सोशल मीडिया युजरने गायत्रीला इंस्टाग्रामवर मेसेज करत तिच्याकडे सेक्सची मागणी केली आहे.
अभिनेत्री गायत्री दातार हिने त्या व्यक्तीच्या या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत याबद्दल राग व्यक्त केला आहे. ‘अशा नीच मानसिकतेला इथेच थांबवलं पाहिजे’, असं म्हणत तिने चाहत्यांना या अकाउंटला रिपोर्ट करण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्री गायत्री दातार ही नुकतीच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.