मराठीच नव्हे तर, हिंदीतही आपल्या अभिनयाने हक्काची जागा निर्माण करणारी अभिनेत्री स्मिता तांबे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. अभिनेत्री स्मिता तांबे ही ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत सध्या सार्थक आणि आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर पोहोचलं आहे. काही दिवसांपूर्वी अतिशय थाटामाटात दोघे लग्न बंधनात अडकले होते. दोघांच्या लग्नानंतर आता सगळं काही ठीक होईल, असं वाटत असतानाच आता आनंदीचा पहिला पती अंशुमन पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात नवे वाद निर्माण करण्यासाठी आला. तर, अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली आता सार्थकला अटक झाली आहे.
मात्र, अंशुमनचा खून झालेलाच नाही. अंशुमन अजूनही जिवंत असून, आनंदीला पूर्वीसारखाच त्रास देत आहे. आनंदी ही गोष्ट सतत सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र, कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. आता सार्थक निर्दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी आनंदी सगळे प्रयत्न पणाला लावणार आहे. मात्र, तिचा हा प्रवास अजिबात सोपा नसणार आहे. सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी नामांकित वकील नेत्रात धर्माधिकारी या मालिकेत एन्ट्री घेणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अखेर आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. या मालिकेतील नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे साकारणार आहे.
नेत्रा धर्माधिकारी ही नाशिक मधील अतिशय प्रसिद्ध वकील आहे. अतिशय हुशार, तल्लख बुद्धीची आणि चालाख असलेली नेत्राने आजपर्यंत एकही केस हरलेली नाही. नेत्रा धर्माधिकारी केस लढणार म्हटल्यावर सगळ्याच विरोधी पक्षातील वकिलांचा भीतीने थरकाप उडतो. हीच नेत्रा आता सार्थकच्या विरोधात केस लढणार, हे कळल्यानंतर आता सगळेच हादरले आहेत. नेत्राचा धाक सगळ्यांनाच आहे. मात्र, आनंदीने आपल्या पतीला निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
नेत्रा धर्माधिकारी हिच्या येण्यामुळे आता या मालिकेत मोठे वळण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या केसमधून सार्थक निर्दोष सुटेल का? आनंदीच्या आयुष्यात आता नेत्रा कोणती नवीन आव्हानं येणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र, स्मिता तांबेच्या एन्ट्रीमुळे आता या मालिकेत रंजक वळण पाहायला मिळणार आहे.