Smita Patil Last Wish : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील एक अशी अभिनेत्री, जिने तरुण वयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिने केवळ अभिनयानेच नाही तर, तिच्या सौंदर्यानेही लोकांची मने जिंकली. पण, तिचं नशीब इतकं दुर्दैवी होतं की, वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ही अभिनेत्री आहे स्मिता पाटील. तिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती. आज (१३ डिसेंबर) स्मिता पाटीलची पुण्यतिथी आहे. अभिनेत्रीला तिचा मृत्यू कळला होता. तिने आपली अखेरची इच्छा देखील सांगून ठेवली होती. तिच्या जवळच्या एका व्यक्तीने तिची ही इच्छा देखील पूर्ण केली होती.
स्मिता पाटील राजकारणाशी संबंधित असलेल्या कुटुंबातून येतात. स्मिता पाटीलचे वडील शिवाजीराव पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते आणि आई सामाजिक कार्यकर्त्या होती. स्मिता मराठी माध्यमाच्या शाळेत शिकली. स्मिता पाटीलने 'घुंगरू' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या दरम्यान आधीच विवाहित असेलेल्या राज बब्बरवर तिचं प्रेम जडलं. मात्र, राज केवळ विवाहितच नाही, तर एक पिताही होता. मात्र, दोघांनीही याची पर्वा न करता एकत्र राहण्यास सुरुवात केली आणि नंतर गुपचूप लग्न केले.
अभिनेत्री स्मिता पाटील हिने आपल्या अभिनय कारकिर्दीत एक नाही, तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिने अनेक हिट सिनेमे दिले. ही अभिनेत्री राजसोबत राहिली आणि लग्न केले. स्मितासाठी राजने पत्नी आणि मुलांना सोडले होते, असे सांगितले जाते. मात्र, जेव्हा अभिनेत्री गरोदर राहिली आणि बाळाला जन्म दिला, तेव्हा तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आणि या समस्यांमुळे तिचा मृत्यू झाला. यावेळी तिचं अवघं १५ दिवसांचं बाळ पोरकं झालं.
स्मिताची शेवटची इच्छा होती की, तिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह वधूप्रमाणे सजवावा. तिचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती त्यांना आपला भाऊ मानायची. तिचा मृत्यू झाला, तेव्हा स्मिताच्या आईने तिला आणलेल्या मेकअप किटनेच तिचा मेकअप करण्यास सांगितले. हे ऐकून दीपक ढसाढसा रडू लागले. पण, मग त्याने हिंमत एकवटून स्मिताचा मेकअप केला आणि नववधूप्रमाणे सजवून तिला या जगातून निरोप दिला.
संबंधित बातम्या