मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suman Kalyanpur: एकीकडे घर जळत होतं अन् दुसरीकडे सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण मिळाल्याचा फोन आला!

Suman Kalyanpur: एकीकडे घर जळत होतं अन् दुसरीकडे सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण मिळाल्याचा फोन आला!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 26, 2023 09:01 AM IST

Padma Bhushan announces to Singer Suman Kalyanpur: भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना यंदा ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

Suman Kalyanpur
Suman Kalyanpur

Padma Bhushan announces to Singer Suman Kalyanpur: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना यंदा ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. एकीकडे पद्मभूषण घोषित झाल्याची आनंदवार्ता मिळाली होती, मात्र त्याचं वेळी सुमन कल्याणपूर यांच्यावर एक वाईट प्रसंग ओढवला होता. याच दिवशी त्याच्या मुंबईतील निवासस्थानी आग लागली होती.

हिंदुस्तान टाईम्सशी साधलेल्या संवादात त्यांनी या प्रसंगाचा किस्सा सांगितला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याच वेळी सुमन कल्याणपूर यांच्या घराला आग लागली होती. प्रथम दर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे म्हटले जात आहे. सील न केलेल्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये हे शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज बाधण्यात येत आहे. सध्या त्या मुंबईतील नातेवाईकांच्या घरी असून, त्यांचे घर पूर्ववत होण्यास १५-२० दिवस लागणार आहेत.

या घटनेबद्दल सांगताना सुमन कल्याणपूर म्हणाल्या की, ‘आम्ही संपूर्ण रात्र असहाय वाटून काढली. अशावेळी कुठे जायचे ते कळत नव्हते. मी माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांसह रस्त्याच्या कडेला उभे होते आणि अग्निशमन दलाचं सुरू असलेलं काम बघत होते. यानंतर आम्ही शहरातील एका नातेवाईकाच्या घरी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.’ बुधवारी पहाटे ही घटना घडली. दिवसभर सुमन कल्याणपूर चिंतेत होत्या. मात्र, संध्याकाळी त्यांना आनंदाची वार्ता कळली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मभूषण पुरस्कारांमध्ये सुमन कल्याणपूर यांचे देखील नाव आहे.

काही तासांपूर्वी चिंतेत असलेल्या सुमन कल्याणपूर या बातमीमुळे आनंदी झाल्या. त्या म्हणाल्या की, ‘आज मी खूप आनंदी आहे. मी संगीत क्षेत्रात मोठ्या निष्ठेने काम केले असून, अनेक गाणी गायली आहेत. लोकांनी माझ्या कामाचे नेहमीच कौतुक केले आहे. आज मला पूर्णत्व वाटत आहे.’ ‘ब्रह्मचारी’ चित्रपटामधील ‘आज कल तेरे मेरे प्यार’ आणि ‘बात एक रात की’मधील ‘ना तुम हमें जानो’ या गाण्यांसाठी सुमन कल्याणपूर प्रसिद्ध आहेत. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांना भारत सरकारचा ‘पद्मभूषण पुरस्कार घोषित झाला आहे.

WhatsApp channel