बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आणि बिग बॉस स्पर्धक राहुल वैद्य सध्या चर्चेत आहे. राहुलने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमारशी लग्नगाठ बांधली. आता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. त्यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे.
राहुल वैद्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने फोटो शेअर करत मुलगी झाल्याचे सांगितले आहे. 'आमच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि मुलगी दोघींचीही प्रकृती चांगली आहे. माझ्या मुलीकडे डॉक्टरांचे चांगले लक्ष आहे. मी त्यांचे आणि कुटुंबातील व्यक्ती ज्यांनी आम्हाला या काळात मदत केली त्यांचे आभार मानतो. आमच्या बाळाला आशिर्वाद द्या' या आशयाचे कॅप्शन राहुलने फोटोला दिले आहे.
वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर बाप्पाचे जल्लोषात स्वागत पाहा व्हिडीओ
राहुल वैद्यच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच अली गोणी, नकुल मेहता, शेफाली, धामी दृष्टी, वेदीका भंडारी आणि इतर काही कलाकार मंडळींनी कमेंट करत राहुल आणि दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत.
१६ जुलै २०२१ रोजी राहुल आणि दिशाने लग्नगाठ बांधली. बिग बॉस १४च्या घरात असतानाच राहुलने दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांचा एक मुलगी झाल्याचे समोर आले आहे.