Amaltash Trailer: मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचे म्हणायला हरकत नाही. सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता एक नवाकोरा चित्रपट 'अमलताश' हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात गायक राहुल देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून एका वेगळ्या विषयावर आधारित हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.
'अमलताश' हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट आहे. चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाताना दिसतेय. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी आल्याचे दिसत आहे, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे 'त्या' कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.
वाचा: 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या मुहूर्तावर 'दगडू'चा साखरपुडा संपन्न
'अमलताश' या चित्रपटाचे लेखन सुहास देसले यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शिनही त्यांचेच आहे. या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे. ८ मार्चला हा चित्रपट चित्रपटसृष्टीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुहास देसले म्हणतात, "चित्रपटाचे वेबसीरिज मध्ये रूपांतर होते. मात्र इथे उलट झाले आहे. व्हिडीओ ब्लॉग म्हणून सुरु झालेला हा आमचा प्रवास पडद्यावर चित्रपटरूपात झळकणार आहे. राहुलनेच हे सर्व सुरू केले आणि त्यामुळे आपोआपच ते संगीतमय चित्रपटरूपात प्रकट झाले. आम्ही निवडलेले सगळे कलाकार हे मुळात संगीतकार आहेत आणि चित्रपटात वापरलेली सर्व गाणीही सेटवर थेट रेकॉर्ड केली आहेत. आपण आपल्या प्रामाणिक भावना संगीतातून व्यक्त करू शकतो, त्यामुळे शक्य होईल तितके संगीत व्यक्त करणे, हा चित्रपटामागचा विचार होता. आमच्याकडे चित्रपटाची कथा नव्हतीच. आम्ही संगीत आणि पात्रांच्या जीवनावर यात भाष्य केले आहे आणि हाच चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटेल कारण यातील पात्र तुम्हाला आपल्यातीलच भासतील. एखाद्या प्रियजनासारखी ही पात्रे तुमच्याशी बोलतील. आमचे चित्रीकरण हे पुण्यात झाले आहे. खूप तरल विचार करून पुणे न्याहाळले तर पुणे शहर हे एखाद्या कवितेसारखेच भासेल. अमलताश, बहावा, वर्षातून एकदाच फुलतो, आपले जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो, आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रत्येकासाठी असेल."
संबंधित बातम्या