अनुराधा पौडवाल यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर! ‘या’ कलाकारांचाही होणार सन्मान-singer anuradha paudwal announced ganasmaragyi lata mangeshkar award 2024 these artists will also be honored ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अनुराधा पौडवाल यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर! ‘या’ कलाकारांचाही होणार सन्मान

अनुराधा पौडवाल यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर! ‘या’ कलाकारांचाही होणार सन्मान

Aug 13, 2024 03:49 PM IST

Singer Anuradha Paudwal: संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

Singer Anuradha Paudwal
Singer Anuradha Paudwal

Singer Anuradha Paudwal: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, यंदाचा म्हणजेच २०२४च्या ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. आपल्या सुमधुर आवाजाने नेहमीच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अनुराधा पौडवाल यांचा आता मानाच्या पुरस्काराने सन्मान होणार आहे. या पुरस्कारासोबतच ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’, ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’, ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’, ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’, ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारां’ची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली आहे.

संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा २०२४च्या ‘भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२४साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे.

Happy Independence Day 2024: ‘या’ हिंदी आणि मराठी गाण्यांशिवाय अधुराच वाटतो स्वातंत्र्यदिन! तुम्ही ऐकलीत का?

‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४’चा पुरस्कार श्रीमती शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना गौरवण्यात आले आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल २०२४चा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३’साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून, २०२४साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास या पुरस्काराने गौरवण्यात येते.

‘या’ कलाकारांचाही होणार सन्मान!

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक या विभागासाठी २०२४चा पुरस्कार विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये पुरस्कार डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारातील २०२४चा पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे. लोककला क्षेत्रातील २०२४चा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना जाहीर झाला असून, शाहीरी क्षेत्रातील पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील पुरस्कारासाठी सोनिया परचुरे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे. तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील पुरस्कार पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात नागेश सुर्वे (ऋषीराज) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील २०२४चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत यांना घोषित झाला आहे. तर, आदिवासी गिरीजन वर्गवारीमध्ये २०२४ साठी शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.

काय आहे पुरस्काराचे स्वरूप?

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे होते. ते आता १० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे झाले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र होते. तर आता या पुरस्काराचे स्वरूप रुपये ३ लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे झाले आहे.

विभाग