
Sindhutai Majhi Mai Latest Update: छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. याच ओघात आलेल्या एका नव्या मालिकेने मात्र प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘अनाथांची माय’ म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. या मालिकेत सिंधुताई यांचा ‘चिंधी’ ते ‘सिंधू’ असा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे छोट्या ‘चिंधी’ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असतानाच, आता या मालिकेत मोठा लीप येणार आहे. तर, या चिमुकल्या ‘चिंधी’ची जागा आता मोठी ‘सिंधू’ घेणार आहे.
‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत आता छोटी चिंधी मोठी होणार असून, लवकरच तिचा पुढचा प्रवास पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावर कोणती अभिनेत्री सिंधुताई सपकाळ यांची भूमिका साकारणार?, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर आता सिंधुताई साकारणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार ही आता या मालिकेत तरुणपणीच्या सिंधूताई सपकाळ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेआधी अभिनेत्री शिवानी सोनार ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने एक पोलीस अधिकारी होऊ पाहणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून शिवानी ‘संजीवनी ढाले-पाटील’ बनून घराघरांत पोहोचली होती. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यावेळी ती ‘सिंधुताई’ बनून प्रेक्षकांना त्यांच्या प्रवासाची एक नवी बाजू दाखवणार आहे. यासाठी शिवानी सोनार देखील खूप उस्तुक आहे. तिच्यासाठी देखील ही भूमिका काहीशी आव्हानात्मक असणार आहे.
‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत आता प्रेक्षकांना छोट्या चिंधीचा मोठा प्रवास पाहायला मिळणार आहे. आता चिंधीचं लग्न होणार असून, ती लवकरच अण्णांचं घर सोडून आपल्या सासरी रवाना होणार आहे. मुलगी परक्याच्या घरी जाणार या विचाराने तिच्या वडिलांना म्हणजेच अण्णांना रडू कोसळलं आहे. शिक्षणाची आवड असणाऱ्या चिंधीला आता सगळं सोडून केवळ संसार सांभाळावा लागेल या विचाराने बापाचं मन विषण्ण झालं आहे. मात्र, या मालिकेत आता सिंधुताई यांच्या आयुष्यातील पुढील टप्पा पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
