Sidhu MooseWala Father Video: पंजाबचा प्रसिद्ध गायक दिवंगत सिद्धू मुसेवाला याच्या कुटुंबात दोन वर्षांनंतर आनंदाचं वातावरण आहे. सिद्धू मुसेवाला याची आई चरण कौर यांनी वयाच्या ५८व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्म झाल्यापासून संपूर्ण कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. परंतु, आता सिद्धू मुसेवाला याचे वडील मात्र काळजीत पडले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते पंजाब सरकारवर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांवर जरा दया दाखवावी अशी विनंतीही ते सरकारला करताना दिसले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...
सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, 'सत् श्री अकाल सर्वांना.. आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या कारणासाठी बोलत आहे. तुम्हाला माहिती आहेच की, दोनच दिवसांपूर्वी देवाच्या कृपेने आणि तुमच्या प्रार्थनेने आम्ही आनंदी झालो आणि आमचा शुभदीप आमच्याकडे परतला. पण, मी आज सकाळपासून अस्वस्थ आहे. मला वाटते की, या संपूर्ण प्रकरणाची माहिती तुम्हालाही देणे गरजेचे आहे.’
ते पुढे म्हणाले की, 'पंजाब सरकार माझ्याकडून या माझ्या मुलाची कायदेशीर स्थिती सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांची मागणी करत आहे. मी सरकारला, विशेषत: मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो की, कृपया मला मुलाचे उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. मी इथे पंजाबमध्येच राहतो. जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल, तेव्हा मी उपलब्ध असेन. त्यामुळे मला माझ्या मुलावर उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी.’
बलकौर सिंह पुढे म्हणाले की, 'माझ्या मुलाने त्याच्या २८ वर्षांच्या आयुष्यात कायद्याचे पालन केले. मी लष्करात काम केले असल्याने कायद्याचा पूर्ण आदर करतो. मी तुम्हाला याची खात्री देऊ इच्छितो की, मी कायद्याला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. मी काही चूक केली आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही मला अटक करू शकता. तरीही तुम्हाला शंका असेल तर, माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करा. मी तुम्हाला सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवीन असे वचन देतो.’
सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओ पोस्ट करताना बलकौर सिंह यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की,'सरकार नवजात बाळाच्या आनंदात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. ही भीती किंवा मजबुरी कशाची आहे?'. गायक सिद्धू मुसेवाला याच्या आईने १७ मार्च रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गायकाच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी हा मोठा निर्णय घेतला होता.
संबंधित बातम्या