Yodha Release Date Postponed: ‘शेरशाह’च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ या नव्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा दिसत आहे. चाहते गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाच्या रिलीजची वात बगाहत आहेत. पण आता अशी बातमी समोर आली आहे की, सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘योद्धा’चे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. ‘योद्धा’ हा चित्रपट आधी सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार होता. मात्र, आता या चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. आता सिद्धार्थ मल्होत्राचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘योद्धा’ ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘योद्धा’ हा चित्रपट आता २७ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘शेरशाह’च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा करण जोहरसोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपट करताना दिसणार आहे. 'योद्धा' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची कथा एका विमानाच्या हाय-जॅकभोवती फिरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘योद्धा’मध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री राशी खन्ना, दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा या आगामी चित्रपटाविषयी बोलताना एका मुलाखतीत म्हणाला होता की, ‘एक कलाकार म्हणून मला अशा स्क्रिप्टवर काम करायचे आहे, ज्यामुळे माझ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेता समोर येईल. या चित्रपटामुळे मला स्वतः मधील सुप्त गुण शोधता आले आहेत. यासाठी मी मेकर्सचा आभारी आहे. मला चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे जे प्रेम मिळाले आहे, त्यात जादू भरली आहे. ‘योद्धा’मध्ये आता त्यांना काय पाहायला मिळणार आहे, हे सांगण्यासाठी मी आता आणखी वाट बघू शकत नाही.’
‘योद्धा’ या चित्रपटाव्यतिरिक्त, सिद्धार्थ मल्होत्रा ‘पोलिस फोर्स’ या अॅक्शन थ्रिलर वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राची ही वेब सीरिज रोहित शेट्टी निर्मित असून, सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.