मराठमोळा अभिनेता आणि लेखक म्हणून चिन्मय मांडलेकर ओळखला जातो. त्याने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. चिन्मयने मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची रजा घेत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्याने व्हिडीओ शेअर करत माहिती दिली होती. आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने चिन्मयला पाठिंबा दिला असून ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हे ट्रोलिंग त्याच्या कामामुळे होत नाही, तर त्याच्या मुलाच्या नावावरून होत आहे. नुकताच त्याच्या पत्नीने म्हणजेच नेहा जोशी-मांडलेकर हिने देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने देखील याच मुद्द्यावर संताप व्यक्त केला होता. नेहाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता चिन्मयने देखील एक व्हिडीओ शेअर करत मोठा निर्णय घेतला असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. ‘तुम्ही मला माझ्या कामावरून वाटेल तसे बोला, मी ऐकून घ्यायला तयार आहे. पण, उगाचच चुकीचा विषय घेऊन माझ्या कुटुंबावर आणि त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मी वठवलेल्या भूमिका तुम्हाला आवडल्या किंवा नाही आवडल्या त्याविषयी जे म्हणाल ते मी ऐकून घेईन. पण, आता माझ्या मुलाच्या नावावरून आणि माझ्या पत्नीच्या चरित्र्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जाताना दिसत आहेत. एक माणूस म्हणून मला या गोष्टीचे फार वाईट वाटते. आजवर मी अनेक भूमिका साकारल्या. मात्र, माझ्या भूमिकांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल तर तो मला अजिबात मान्य नाही. म्हणूनच मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे' असे चिन्मय व्हिडीओमध्ये म्हणाला.
वाचा: 'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का
सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चिन्मयचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत, “जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काहीही देणे घेणे नाहीये. आपल्या मनातली सर्व घाण बाहेर काढणे हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग. तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेने आणि प्रामाणिकपणे साकारली आहेस. कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्यासाठी तुझा आदर करतो आहोत. ही भूमिका करणे तू थांबवू नकोस. प्लीज! आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरच्या बरोबर उभे आहोत.”
वाचा: ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कलाकारांच्या हजेरीचा व्हिडीओ व्हायरल
सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या शिवराज अष्टक मालिकेतील पाचही चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे उर्वरित तीन चित्रपटांमध्ये कोण महाराजांच्या भूमिकेत झळकणार? असा प्रश्न नेटकऱ्यांनी कमेंट करत चिन्मय मांडलेकरच्या व्हिडीओवर उपस्थित केला आहे. अनेकांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील त्याला करण्यात येत आहे.
वाचा: 'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार