Hya Goshtila Naavach Nahi : मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट 'ह्या गोष्टीला नावच नाही' हा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली होती. या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. आजपासून हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे ‘श्वास’ या ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सावंत यांनीच हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
संदीप सावंत यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. दिग्दर्शक संदीप सावंत यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळी दृष्टी आणि कथाविषयाचे प्रभावीपण सादर करत असतो. ‘श्वास’ आणि ‘नदी वाहते’ यांसारख्या सिनेमांद्वारे त्यांनी चित्रभाषेची प्रगल्भता आणि गहन विचार मांडले आहेत. मराठी चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नाही, तर जीवनाच्या गूढतेला समजून त्यावर सुस्पष्ट प्रकाश टाकण्याचे कार्य त्यांनी नेहमीच केलं आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये कथाविषयाची गहनता, चित्रभाषेचा प्रभावी वापर आणि समाजातील विविध मुद्द्यांवरचा सकारात्मक दृष्टिकोन असतो. 'ह्या गोष्टीला नावच नाही' या चित्रपटाच्या माध्यमातूनही संदीप सावंत यांनी आपल्या याच शैलीला कायम ठेवले आहे.
डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातून प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचा संघर्ष, माणसाच्या धैर्याची परीक्षा आणि कुटुंबाच्या प्रेमाची शक्ती या गोष्टींचे दर्शन घडते. नायक मुकुंद नैराश्याच्या गर्तेत सापडलेला असतो, पण आपल्या कुटुंबाच्या मदतीने तो या परिस्थितीवर मात करतो. याची कथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
आपल्या या नव्याकोऱ्या चित्रपटाबद्दल बोलताना संदीप सावंत म्हणाले की, ‘आयुष्यात दुःख भोगण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीला दुःखात, त्रासात बघणं हे अधिक दुःखदायक असतं, अशावेळी आपलं जीवन अधिक सुंदर करण्याचं सामर्थ्य आत्मसात करणं गरजेचं असतं, हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.’
या चित्रपटात जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे, अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस यांसारखे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपापल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे.
'ह्या गोष्टीला नावच नाही' या चित्रपटाचे छायाचित्रण प्रियशंकर घोष यांनी केले आहे तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे. साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचे आहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील आणि आकाश जाधव यांनी दिले आहे. पॅनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील आणि डॉ. अंजली सतीशकुमार पाटील आहेत.