काही दिवसांपूर्वी 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाने १५८ टक्के परतावा मिळवून देणारा सर्वात यशस्वी मराठी चित्रपट ठरला होता. सचिन पिळगावकर दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री-पत्नी सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत काम केले होते. पण विशेष म्हणजे दमदम दम दम दम दम डुमरू वाजे या गणपती गाण्यात त्यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकरची विशेष उपस्थिती होती. आता श्रियाने या गाण्यावर वक्तव्य केले आहे.
श्रियाने नुकतीच हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आई-वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. "हा चित्रपट इतका आयकॉनिक आहे की मला काही करुन त्याचा भाग व्हायचे होते. गणपती बाप्पा माझ्या हृदयाच्या इतक्या जवळ आहे की मला या गाण्याचा भाग होण्याची इच्छा झाली. त्यामुळे मी या गाण्यात काम करण्याचा निर्णय घेतला. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे, त्यामुळे माझ्या आनंदात भर पडली आहे" असे श्रिया म्हणाली.
पुढे श्रिया म्हणाली, "मी आणि माझी आई या गाण्यात एकत्र नाचलो. पण मला माझ्या वडिलांसोबत डान्स करायला मिळाला नाही. मात्र, आम्ही स्क्रीन शेअर केली. पण मला वाटते की या सुंदर आठवणी आहेत ज्या माझ्यासाठी नेहमीच महत्वाच्या राहतील."
"मला माझ्या आडनावाचा खूप अभिमान आहे. माझे आई-वडील मला कलाकार म्हणून खरोखरच प्रेरणा देतात आणि मी हे केवळ माझे पालक आहेत म्हणून म्हणत नाही. माझ्या वडिलांचे चित्रपटसृष्टीतील हे ६४ वे वर्ष आहे आणि ते अजूनही खूप सक्रिय आहेत. माझी आई देखील खूप काम करत आहे आणि ते खूप प्रेरणादायी आहेत. त्यांची ऊर्जा, त्यांची आवड आणि कलेबद्दलची समर्पण पाहून त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. आयुष्याच्या या टप्प्यावर माझे आई-वडील ज्या कामाची नैतिकता, जिद्द आणि प्रेम आणि ऊर्जा घेऊन काम करतात ते पाहणे खूप आश्चर्यकारक होते" असे श्रिया म्हणाली.
वाचा: 'दृष्ट लागण्या जोगे सारे' गाण्यातील अभिनेत्रीला खरोखरच लागली दृष्ट? अगदी कमी वयात घेतला जगाचा निरोप
यावर्षी इश्क विश्क रिबाऊंडमध्ये आपल्या आईला पडद्यावर 'कूल मॉम' बनताना पाहून श्रियाला आनंद झाला आहे. खऱ्या आयुष्यातही ती तशीच आहे का असा प्रश्न श्रियाला विचारण्यात आला आहे. "मी म्हणेन की ती मस्त आहे आणि तिच्यात पालक म्हणून ऊर्जा दोन्ही आहे. ती बऱ्याचदा मैत्रीण असते आणि जेव्हा तिला गरज असते तेव्हा ती कठोर होते. पण आता रोल रिव्हर्सल आहे असं मला वाटतं. मला असे वाटते की मी तिची पालक आहे. जेव्हा ती स्वतःची काळजी घेत नाही तेव्हा मी तिच्याशी कठोर झाले. मला वाटतं हे एका वयानंतर घडतं. पण माझे आई-वडील दोघेही अप्रतिम आहेत" असे श्रिया म्हणाली.