Shri Ram Mandir Celebration in Pravin Tarde House: रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा जल्लोषात पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात दिवाळी-दसरा साजरा केला गेला. मराठी कलाकारांनी देखील आपापल्या घरी जल्लोषात हा खास दिवस साजरा केला आहे. एकीकडे अयोध्येत रामलल्ला विराजमान होत असतनाच, अभिनेते-लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या घरी देखील प्रभू श्रीरामाचं आगमन झालं आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी आपल्या घरी आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचं दर्शन सगळ्यांना घडवलं आहे.
अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अशा वेगवेगळ्या भूमिका चपखलपणे निभावणारे प्रवीण तरडे यांनी देखील आपल्या घरात श्रीरामाची स्थापना केली आहे. प्रवीण तरडे यांची पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे हिने हा व्हिडीओ शेअर एक पोस्ट लिहिली आहे. ‘सीतापती प्रभू श्रीरामचंद्र यांस साष्टांग दंडवत. प्रभू, त्रेतायुगात तुम्ही १४ वर्षे वनवास भोगला आणि या घोर कलियुगाने मात्र तुम्हाला तब्बल ४९६ वर्षांसाठी वनवासात धाडले. यासाठी काळ तुमचा क्षमाप्रार्थी आहे. परंतु, ज्याप्रमाणे त्रेतायुगीन वनवासात तुम्हाला अनेक भक्तांनी यथाशक्ती सर्वतोपरी मदत केली, प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले त्याचप्रमाणे कलियुगातही अनेक वीर भक्तांनी रामकार्यासाठी जीवन समर्पित केले. नि:शस्त्र भक्तांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला, त्यावेळी प्राणांची आहुती दिलेल्या भक्तांच्या रक्ताने शरयू नदीचे पाणीदेखील लाल झाले.’
पुढे त्यांनी लिहिले की, ‘कलियुगातील रामायणाचा हा रक्तरंजित अध्याय संपवून, राक्षसी वृत्तींचा पराभव करुन अखेरीस तुम्ही स्वगृही अयोध्येस परतत आहात.. प्रभू तुमचे स्वागत असो! आज आम्हा समस्त सनातन हिंदू धर्मियांना, तुमच्या भक्तांना अपार आनंद होतो आहे. तुम्ही अयोध्येस परत आलात म्हणजे आता या भारतवर्षात रामराज्य पुन्हा सुरु झाले आहे असेच आम्ही सर्वजण मानतो. कलियुगातील या रामराज्यात भारत देश धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक या सर्व स्तरांवर प्रगतीशील होवो, येथे समृद्धी नांदो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. सीतापती श्रीरामचंद्र की जय! सनातन हिंदू धर्म की जय! यतो धर्मस्ततो जयः’
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत श्रीरामाचं स्वागत केलं आहे. यावेळी प्रवीण तरडे यांच्या हातात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मुर्त्या दिसत आहेत.
संबंधित बातम्या