Shraddha Kapoor Dance Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच जल्लोष करताना दिसत असते. एखादी पार्टी असो, वा लग्न सोहळा... श्रद्धा कपूर अगदी दिलखुलास डान्स करताना दिसते. आता देखील जवळच्या मैत्रिणीच्या लग्नात श्रद्धा कपूर हिचा भन्नाट बेफाम डान्स पाहायला मिळाला आहे. नुकतीच श्रद्धा कपूर हिने तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली होती. हेअर स्टायलिस्ट निकिता मेनन हिचा विवाह सोहळा नुकताच गोव्यात पार पडला. या लग्न सोहळ्यात श्रद्धा कपूर धमाल डान्स करताना दिसली आहे. तिचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूर तिची हेअर स्टायलिस्ट मैत्रीण निकिता मेनन हिच्या लग्न सोहळ्याचा आनंद घेत आहे. प्री-वेडिंगपासून ते लग्नापर्यंत निकिताच्या प्रत्येक फंक्शनला श्रद्धा कपूर हिने हजेरी लावली होती. या दरम्यान प्रत्येक फंक्शनमध्ये श्रद्धा कपूर हिने धमाल डान्स केला. या सोहळ्यातील अभिनेत्रीचे डान्स व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहेत. या लग्न सोहळ्यात सलमान खानच्या 'मुझसे शादी करोगी' ते रणवीर सिंहच्या ‘दिल तो एंवी एंवी लुट गया’ या गाण्यांवर डीजेवर मित्रांसोबत डान्स करताना दिसली आहे. यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने गुलाबी रंगाचा फुलांची डिझाईन असलेला लेहेंगा परिधान केला होता.
श्रद्धा कपूरचे या लग्न सोहळ्यातील काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात ती नवरा-नवरीसोबत 'मुझसे शादी करोगी' या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसली आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये, श्रद्धा कपूर ‘दिल तो एंवी एंवी लुट गया’ या गाण्यावर जोमाने नाचताना दिसत आहे. श्रद्धा कपूरच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, तिने तिचा लूक अगदी साधा ठेवला होता. फ्लोरल लेहेंग्यात श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत होती.
व्हिडीओ व्यतिरिक्त, अभिनेत्रीचे फोटो देखील खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या हातावर काढलेली मेहेंदी दाखवत आहे. श्रद्धा कपूरच्या या स्टाईलने सगळ्यांना घायाळ केलं आहे. श्रद्धा कपूरचा हा अवतार पाहून चाहते तिला आपल्या ‘हृदयाची राणी’ म्हणताना दिसत आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटात दिसली होती. त्यांचा हा चित्रपट पडद्यावर सुपरहिट ठरला होता. सध्या श्रद्धा कपूर 'स्त्री २' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यासोबतच ती 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे.