मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivpratap Garudjhep : ‘शिवप्रताप गरुड़झेप’मध्ये सोयराबाईंच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

Shivpratap Garudjhep : ‘शिवप्रताप गरुड़झेप’मध्ये सोयराबाईंच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 17, 2022 01:55 PM IST

येत्या ५ ऑक्टोबर रोजी 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

शिवप्रताप गरुडझेप
शिवप्रताप गरुडझेप (HT)

रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांच्या भूमिकेत कोण दिसणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईक हिने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ‘शिवप्रताप गरुड़झेप’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची महत्त्वपूर्ण भूमिका ती यात साकारणार आहे. 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.
वाचा: खुशखबर! दगडी चाळ २ पाहायला मिळणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर

बऱ्याच कालावधीनंतर तेसुद्धा ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते, असं मनवा सांगते. अत्यंत रूपवान आणि लावण्यवती असणाऱ्या सोयराबाई यांची भूमिका करायला मिळणं माझ्यासाठी ही महत्तवपूर्ण होतं. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वत:ला ही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे.

आग्रा येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून युक्ती, साहस व दूरदृष्टी यांच्या जोरावर महाराजांनी मिठाईच्या पेटार्‍यातून बसून स्वतःची व राजपुत्र संभाजीची नजरकैदेतून सुटका करून घेतली. आग्रा येथून यशस्वीपणे निसटून दख्खनमध्ये रायगड येथे येण्यात महाराजांनी यश मिळविले. शिवचरित्रातील ही तेजस्वी यशोगाथा शिवप्रताप गरुड़झेप या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरला 'शिवप्रताप गरुडझेप' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग