स्टार प्रवाह वाहिनीवर काही दिवसांपूर्वी सुरु झालेली 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका अतिशय लोकप्रिय आहे. मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे ही मानसीची भूमिका साकारताना दिसत आहे. शिवानी बऱ्याच दिवसांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्यामुळे चाहत्यांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळाली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. आता या मालिकेत एक रंजक वळण आले आहे.
नात्यांची हळुवार गोष्ट उलगडणाऱ्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या लोकप्रिय मालिकेत मानसीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. खरतर आपल्या मुलीने शिकून स्वावलंबी व्हावे, तिचे चांगल्या घरात लग्न व्हावे हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. मानसीच्या बाबांनीही आपल्या मुलींसाठी खूप स्वप्न पाहिली आहेत.
वीट भट्टीतला कामगार ते वीटभट्टीचा मालक हा संघर्ष मानसीच्या बाबांनी संपूर्ण आयुष्यात अनुभवला आहे. त्यामुळे आपण जे भोगले ते आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये अशी त्यांची सतत इच्छा असते. म्हणूनच आपल्यापेक्षाही श्रीमंत असलेले खानदानी स्थळ त्यांनी मानसीसाठी शोधले आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी कोणताही निर्णय घेऊ शकते हे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मालिकेत मानसी रणजीतसोबत लग्न करण्यास देखील तयार झाल्याचे दिसत आहे.
वाचा: 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडने केला होता छळ, वाचा खासगी आयुष्याविषयी
मानसीने आजवर स्वत:च्या आनंदाचा कधीही विचार केला नाही. इतरांच्या आनंदासाठी आपण मन मारुन जगतोय हेही तिच्या लक्षात येत नाही. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हेच मानसीचे ध्येय आहे. तिने स्वत:साठी कधी स्वप्ने पाहिली नाहीत. त्यामुळेच प्रेम काय लग्नानंतरही होईल असे तिचे मत आहे. मानसीने लग्न करण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणार आहे. कसा असेल मानसीचा यापुढील प्रवास? रणजीतने मानसीशी का लग्न केले आहे? त्याच्यावर जबरदस्ती तर करण्यात आली नाही ना? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकेचा आगामी भाग पाहावा लागणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वे ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देवयानी मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास ९ वर्षांनंतर शिवानी सुर्वे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
संबंधित बातम्या