सध्या मराठी मालिका विश्वात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसत आहेत. गील्या काही महिन्यांपासून अनेक नव्या मालिकांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. या दरम्यान आता अभिनेत्री शिवानी सुर्वे हिची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका देखील टेलिव्हिजनवर दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत शिवानी सुर्वे एका नव्या हटके भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे नवे प्रोमो सध्या सोशल मीडिया आणि टीव्हीवर गाजताना दिसत आहे. याच निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावूक पोस्ट लिहित प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.
अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘१२ वर्षांपूर्वी स्टार प्रवाह परिवारा सोबत एक प्रवास सुरु केला होता जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा ठरला. “देवयानी”ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, आपलंस केलं, आज पर्यंत मनात ठेवलं. आज पुन्हा एक नवीन प्रवास सुरू करते आहे स्टार प्रवाह बरोबर, ‘थोड तुझं आणि थोड माझं’ या मालिकेमधून मी येणार आहे तुम्हाला भेटायला. या ‘मानसी’वर सुद्धा असंच भरभरून प्रेम करा आणि मला खात्री आहे की, ‘मानसी’सुद्धा तुमचं मन नक्की जिंकेल. तुमच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद कायम राहुद्यात’.
टीव्ही मालिका ‘देवयानी’मधूनच अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने आपला मनोरंजन विश्वातील प्रवास सुरू केला होता. या प्रवासात शिवानी सुर्वे हिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘देवयानी’ या मालिकेत शिवानी सुर्वे हिने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील ‘देवयानी आणि संग्राम’ ही जोडी खूप गाजली होती. तर, ‘तुमच्यासाठी काय पण’ हा संवाद देखील प्रचंड गाजला होता. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. यानंतर शिवानी चित्रपटांकडे वळली होती. या दरम्यान तिने मालिका विश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार आहे.
नुकतंच शिवानी सुर्वे हिचं लग्न पार पडलं असून, तिने अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. यावर्षी त्यांनी अखेर लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्यात पुढंच पाऊल टाकलं आहे. दोघेही सध्या मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यातून ते एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत. अजिंक्यची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गाजत आहे. तर, शिवानी सुर्वे अखेर ‘वाळवी’ या चित्रपटात झळकली होती.
संबंधित बातम्या