Mangla : 'मंगला'वरील अ‍ॅसिड हल्ल्यातील गूढ नेमकं काय? ‘या’ दिवशी रिलीज होणार शिवाली परबचा चित्रपट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mangla : 'मंगला'वरील अ‍ॅसिड हल्ल्यातील गूढ नेमकं काय? ‘या’ दिवशी रिलीज होणार शिवाली परबचा चित्रपट

Mangla : 'मंगला'वरील अ‍ॅसिड हल्ल्यातील गूढ नेमकं काय? ‘या’ दिवशी रिलीज होणार शिवाली परबचा चित्रपट

Published Oct 05, 2024 02:49 PM IST

Mangla Marathi Movie :सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Shivali Parab starrer Mangla Marathi Movie
Shivali Parab starrer Mangla Marathi Movie

Mangla Marathi Movie : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या लोकप्रिय कार्यक्रमातुन घराघरांत पोहोचलेली कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता शिवाली मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. अभिनेत्री शिवाली परब हिची मुख्य भूमिका असलेला'मंगला'हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. बरेच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत होती. आशयघन व भयावह कथेचा सार घेऊन'मंगला'हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२५ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मंगला’ या चित्रपटातून एक वेगळी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट घोषित केली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून या अ‍ॅसिड हल्ल्याची प्रचितीही येत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर शिवाली ‘मंगला’ या भूमिकेत असून तिच्या चेहऱ्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याची खूण पाहायला मिळत आहे. हे चित्र पाहण्याजोगं नसलं तरी या मागील गहन विषय साऱ्यांना खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंका नाही.

गायिकेवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याची थरारक कहाणी! 'मंगला' चित्रपटातून उलगडणार थक्क करणारा जीवनप्रवास

उलगडणार मंगलाचा प्रेरणादायी प्रवास

मंगलावर झालेला अ‍ॅसिड हल्ला आणि त्या कठीण परिस्थितीशी तिने दिलेली झुंज या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तसेच, त्याकाळी या अ‍ॅसिड हल्ल्याशी संबंधित कोणताही कायदा नसल्याने योग्य तो न्याय न मिळाल्याने या लढ्याचा सामना मंगलाने कसा केला अशी खरीखुरी कथा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. सगळेच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

'रैश प्रोडक्शन प्रा.लि'आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट'प्रस्तुत 'मंगला'या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग,यशना मुरली,मोहन पुजारी,मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. ‘मंगला’ची ही खरीखुरी कथा १० जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.

Whats_app_banner