मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत एक नावाजलेला चेहरा म्हणून अभिनेते शिवाजी साटम यांना ओळखले जाते. सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. यात त्यांनी एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारली होती. सीआयडीमधील ‘कुछ तो गडबड है’ या डायलॉग ऐकला तर आजही शिवाजी साटम यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. पण तुम्हाला माहितीये का, अभिनेते शिवाजी साटम यांची सूनही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती लवकरच रंगभूमीवर दिसणार आहे.
शिवाजी साटम यांच्या सूनेचे नाव अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आहे. मधुरा आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित 'आपण यांना पाहिलंत का?' या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
वाचा: बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या कुठे आहे? जाणून घ्या तिच्याविषयी
ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटके दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीने आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. आता तुषार दळवी, मधुरा वेलणकर साटम, विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांना घेऊन 'आपण यांना पाहिलेत का?' या नाटकात विजय केंकरे मराठी नाट्यप्रेमींना काय नवीन अनुभव देतात याची उत्सुकता आहे. तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर साटम यांच्यासह विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अजित परब यांनी नाटकाचं संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना, मंगल केंकरे यांनी वेशभूषा, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची जबाबदारी निभावली आहे.
वरदा-वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू नये असं चाळीशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जोडप्याला वाटत असतं. संसारात एकत्र आहोत म्हणजे सगळं शांत आणि निवांत. असं खरच असतं? अश्यातच अचानकपणे त्यांच्या आयुष्यात आणि घरात एक वादळ प्रवेश करतं. या वादळाच्या येण्यानं त्या जोडप्याच्या नात्याचं, त्यांच्या संसाराचं काय होतं? याची नर्म विनोदी गोष्ट 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकाद्वारे आपल्या अनुभवास येणार आहे.