मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा कायम चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनची ट्रॉफी जिंकून शिवने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर बिग बॉस हिंदीच्या १६व्या सिझनमध्ये तो दिसला. या सिझनचा तो भलेही विजेता ठरला नसला तरी देशभरातील चाहत्यांची मने त्याने जिंकली. आज ९ सप्टेंबर रोजी शिव ठाकरेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया शिव विषयी काही खास गोष्टी...
महाराष्ट्रातील अमरावती शहरात ९ सप्टेंबर रोजी शिवचा जन्म झाला. गरीब कुटुंबात जन्मलेला शिव ठाकरे चाळीत लहानाचा मोठा झाला. शिवला एक बहीण आहे. त्याच्या वडिलांचे एक दुकान आहे. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे लहानपणापासूनच शिव कुटुंबीयांना मदत करत असे. बहिणीसोबत तो दूध आणि पेपर विकण्याचे काम करायचा. तसेच वडिलांना दुकानात देखील मदत करत असे. पण कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी शिवने डान्स क्लास सुरू केले, तेथून त्याची चांगली कमाई सुरु झाली.
एमटीव्ही रोडीजसाठी त्याने ऑडिशन दिले आणि त्यात सिलेक्टही झाला. त्या काळात तो पहिल्यांदाच टीव्हीवर दिसला होता. शिवच्या स्वभावाने रोडीजचे परीक्षक रणविजय आणि करण कुंद्रा यांची मने जिंकली. डान्स क्लासेसमधून १५-२० हजार रुपये कमावणारा शीव हळूहळू आपल्या फिटनेसवर काम करू लागला. शीव रोडीजचा उपविजेता ठरलेला. त्यानंतर शिवची बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनसाठी निवड झाली. हा शो शिवने जिंकला. त्यानंतर तो हिंदी बिग बॉसमध्येही दिसला.
वाचा: अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता? 'माझ्या बच्चा' पाहा मजेशीर व्हिडीओ
काही दिवसांपूर्वी शिवने खुलासा केला की, तो ‘बिग बॉस मराठी’ सीझन २ हा शो जिंकला असला तरी जिंकलेल्या रकमेपैकी निम्म्याहून अधिक रक्कम कापली गेली आणि त्याला खूप कमी बक्षीस रक्कम मिळाली. शिवने म्हटले की, पहिला या शोच्या विजेत्यांना बक्षीस रक्कम म्हणून २५ लाख रुपये मिळणार होते. पण, नंतर फिनालेच्या वेळी शेवटच्या क्षणी एक ट्विस्ट आला आणि विजेत्याची रक्कम १७ लाख रुपये करण्यात आली. पण हे इथेच थांबलं नाही. यानंतर आणखी काही काटछाट करून बक्षीस रक्कम म्हणून फक्त ११.५ लाख रुपये हातात आले. इतकेच नाही, तर कुटुंबाच्या विमान तिकीट भाडे आणि काही कपड्यांचे बिल यांसारख्या इतर सुविधाही कमी करण्यात आल्या.