Shiv Thakare Abdu Rozik Summoned By ED: सध्या ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावर अनेक कलाकार आहेत. आता ‘बिग बॉस १६’चे दोन लोकप्रिय स्पर्धक ईडीच्या रडारवर आले आहेत. अभिनेता शिव ठाकरे यांना ईडीने समन्स बजावले असून हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. यासोबतच अब्दु रोजिक यालाही ईडीचे समन्स मिळाले आहेत. दोघांची जोडी बिग बॉसमुळे जगभर प्रसिद्ध झाली आहे. या दोघांच्या मैत्रीचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे. या शोमधून यश मिळवल्यानंतर दोघांनीही आपापले रेस्टॉरंट उघडले होते. मात्र, त्यांचे हेच रेस्टॉरंट्स आता वादात सापडले असून, या रेस्टॉरंट्सबाबत ईडी या दोघांची चौकशी करणार आहे.
‘ड्रग माफिया’ म्हणवला जाणारा अली असगर शिराझी सध्या तुरुंगात आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाने शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना त्यांच्याशी संबंधित काही कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स पाठवले असून, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रग माफिया अली असगर शिराझी 'हस्टलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी चालवत होता, जी नार्को-फंडिंगसारख्या गोष्टींमधून पैसे कमवत होती. पुढे याच कंपनीने स्टार्टअप्समध्येही पैसे गुंतवले. शिव ठाकरेनी आपले रेस्टॉरंट उघडले, तेव्हा ही कंपनीही त्यातही सामील झाली होती. शिव ठाकरे याने 'ठाकरे चाय अँड स्नॅक्स' नावाचा नवीन व्यवसाय सुरू केला. तर, अब्दु रोजिकने 'बुर्गीर' नावाने आपले फूड रेस्टॉरंट उघडले आहे.
आता याच प्रकरणी शिव ठाकरेची चौकशी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवला जाणार आहे. शिव ठाकरेंनंतर आता अब्दु रोजिक याचीही चौकशी केली जाणार आहे. मात्र, शिव ठाकरे आणि अब्दु रोझिक यांना आपल्या व्यवसायात गुंतवणूकदार असलेल्या कंपनीच्या मालकाचा नार्को फंडिंगमध्ये सहभाग असल्याबद्दल माहिती नव्हती, असे म्हटले जात आहे. मात्र, दोघांनाही याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ या कंपनीसोबतचा करार संपवला.
'हस्टलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड'ने 'ठाकरे चहा आणि स्नॅक्स'मध्ये मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, तेव्हा शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना या प्रकरणाची माहिती नव्हती. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना केवळ साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलण्यात येणार आहे.