Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बॅस्टियन येथे झाली चोरी, ८० लाखांची बीएमडब्ल्यू चोरीला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बॅस्टियन येथे झाली चोरी, ८० लाखांची बीएमडब्ल्यू चोरीला

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बॅस्टियन येथे झाली चोरी, ८० लाखांची बीएमडब्ल्यू चोरीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 29, 2024 08:21 AM IST

Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये ८० लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू झेड ४ कार चोरीला गेली. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

Shilpa Shettys upscale restaurant Bastian
Shilpa Shettys upscale restaurant Bastian

दादर पश्चिमेकडील कोहिनूर स्क्वेअरच्या ४८ व्या मजल्यावर असलेले बॉलिवूड अभिनेत्री आणि वेलनेस आयकॉन शिल्पा शेट्टी कुंद्राचे रेस्टॉरंट बॅस्टियन- अॅट द टॉप येथे रविवारी अनपेक्षित घटना घडली. या रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून बीएमडब्ल्यू झेड ४ ही ८० लाख रुपये किंमतची आलिशान टू सीटर कन्व्हर्टिबल कार चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी चौकशी करत असून आरोपीला लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेमकं काय घडलं?

वांद्रे येथील ३४ वर्षीय व्यावसायिक रुहान फिरोज खान हा रात्री एकच्या सुमारास दोन मित्रांसह बॅस्टियन येथे जेवायला गेला होता. त्याने आपल्या कारची चावी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या व्हॅलेटकडे सोपवली होती. रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर रुहानने पार्किंग स्टाफला आपली कार परत देण्यास सांगितले. सर्वांनी ती कार शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुठेही सापडली आहे. कार गायब झाल्याचे पाहून रुहानला धक्काच बसला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये बीएमडब्ल्यू अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची पुष्टी केली.

पोलिसात तक्रार दाखल

रुहानच्या तक्रारीनंतर शिवाजी पार्क पोलिसांनी संशयितांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. रुहानचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी सांगितले की, गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

शिल्पाच्या रेस्टॉरंट विषयी

दादर पश्चिमेकडील कोहिनूर स्क्वेअरच्या ४८ व्या मजल्यावर शिल्पा शेट्टी कुंद्राचे बॅस्टियन - अॅट द टॉप नावाचे महागडे रेस्टॉरंट आहे. प्रीमियम डायनिंग अनुभव आणि शहरातील दृश्यांसाठी ओळखले जाणारे बॅस्टियन रेस्टॉरंट मुंबईच्या श्रीमंत लोकांमध्ये एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. पण आता या रेस्टॉरंटच्या इमारतीच्या पार्किंगमधून ८० लाख रुपयांची आलिशान कार चोरीला गेल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
वाचा: पाहुण्या कालाकारांच्या भूमिकेत दिसले ४८ कलाकार, बॉक्स ऑफिसवर ठरला होता हिट! ओळखा पाहू

शिल्पाच्या कामाविषयी

बॉलिवूड अभिनेत्री आणि उद्योजक शिल्पा शेट्टी कुंद्राने १९९३ साली अभिनेता शाहरुख खान आणि काजोलसोबत 'बाजीगर' या थ्रिलर चित्रपटातून पदार्पण केले होते. शिल्पाच्या भूमिकेमुळे तिला वेगळी अशी ओळख मिळाली. त्यानंतर धडकन, फिर मिलेंगे सारख्या हिट चित्रपटांद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी कारकि‍र्दीचा तिचा मार्ग मोकळा झाला. अभिनयापलीकडे, ती फिटनेस, आरोग्य आणि रेस्टॉरंट चेन बॅस्टियनमध्ये गुंतवणूक करणारी एक प्रमुख वेलनेस इन्फ्लुएंसर, लेखिका आणि बिझनेसवुमन आहे. शिल्पाने बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले असून त्यांना वियान आणि समीशा ही दोन मुले आहेत. तिचे कुटुंबीय अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिसतात, ज्यात त्यांचे जवळचे नाते दिसून येते.

Whats_app_banner