
Shilpa Shetty Mumbai House Robbery: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या मुंबईतील घरात मोठी चोरी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा तात्काळ तपास करत दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या दोघांची सध्या चौकशी सुरू आहे. शिल्पाच्या घरी झालेल्या चोरीची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘अभिनेत्रीच्या घरातून काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे सांगण्यात आले होते. याप्रकरणी तपास करत असताना दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यांची अद्याप चौकशी सुरू आहे.’
या प्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार आली होती, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या घरात चोरी झाल्याचे आणि काही मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे सांगण्यात आले होते. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी तपास पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हाऊसकीपिंग मॅनेजरने पोलिसांना चोरीची माहिती दिली होती.
हाऊसकीपिंग मॅनेजरने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘मे महिन्याच्या अखेरीस बंगल्यात काही नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. त्याचवेळी अभिनेत्रीही तिच्या कुटुंबीयांसह परदेशात सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. ६ जून रोजी जेव्हा आम्ही बंगल्यात कामाची स्थिती पाहायला गेलो, तेव्हा हॉल, डायनिंग रूम आणि मास्टर बेडरूममधील सामानाची दुरवस्था झाल्याचे आढळून आले. एवढेच नाही, तर अभिनेत्रीच्या मुलीच्या बेडरूममधील वॉर्डरोबही उघडे होते. त्यानंतर आम्ही तिथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासाठी गेलो. या बंगल्याच्या आवारात मास्क घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीला स्लाइडिंग खिडकी उघडून बेडरूममध्ये प्रवेश करून वस्तू चोरताना मी पाहिले.’
या तक्रारीवरून, भारतीय दंड संहिता कलम ४५७ (अतिक्रमण किंवा घर फोडणे), ३८० (चोरी), ५११ (गुन्हा करण्याचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर अभिनेत्रीच्या बंगल्याच्या आसपासच्या भागात बसवण्यात आलेल्या ७०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गेले. तपासानंतर विलेपार्ले परिसरातून दोघांना अटक करण्यात आली. शिल्पा शेट्टी सध्या मुंबईबाहेर आहे. सध्या अभिनेत्री इटलीमध्ये तिच्या कुटुंबासोबत सुट्टी साजरी करत आहे.
संबंधित बातम्या
