सध्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत २३ जूनला लग्न करणार आहे. सोनाक्षीच्या लग्नाच्या ठिकाणापासून ते पाहुण्यांच्या यादीपर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. मात्र, यावर सोनाक्षी किंवा झहीरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यादरम्यान सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘आजकालची मुलं आई-वडिलांना काही विचारत नाहीत, फक्त सांगतात.’’
सोनाक्षीच्या लग्नाच्या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शत्रुघ्न सिन्हा सध्या दिल्लीत आहेत. आपल्या मुलीच्या लग्नाच्या बातमीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी जणू आपल्याला काहीच माहित नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
‘झूम’सोबतच्या खास संवादात जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांची मुलगी सोनाक्षीच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ‘मी दिल्लीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी अजूनही इथेच आहे. मी अजून माझ्या मुलीसोबत याबद्दल बोललेलो नाही. तुमचा काय प्रश्न आहे की, ती लग्न करत आहे? पण, तिने मला अजून याबद्दल काहीही सांगितले नाही हे माझे उत्तर आहे. मी मीडियात जे वाचले, तेच मला माहीत आहे. जेव्हा ती माझ्याशी कशाहीबद्दल बोलते, तेव्हा माझे आशीर्वाद नेहमी तिच्या पाठीशी असतात. त्यांना जगातील सर्व सुख मिळावे, अशी आमची इच्छा आहे.’
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, ‘आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती कोणताही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. ती प्रौढ आहे आणि स्वतःचे निर्णय घेऊ शकते. तिचे लग्न झाल्यावर मी तिच्या लग्नाच्या मिरवणुकीत जोरदार नाचणार आहे. लोक मला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत. मला याबद्दल काहीच माहिती नाही आणि मीडियाला सर्व काही माहित आहे. यावर मी एवढेच सांगू इच्छितो की, आजकालची मुलं त्यांच्या पालकांना काहीच विचारत नाहीत, ते फक्त येऊन सांगतात. आताही आम्ही ती सांगण्याची वाट पाहत आहोत.’ सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा इव्हेंट्समध्ये एकत्र दिसले होते. पण, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले होते. आता हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
संबंधित बातम्या