मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘लाजा वाटत नाहीत का?’; अभिनेता शशांक केतकर का आणि कुणावर संतापला? Viral Video बघाच...

‘लाजा वाटत नाहीत का?’; अभिनेता शशांक केतकर का आणि कुणावर संतापला? Viral Video बघाच...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 15, 2024 12:52 PM IST

घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेने सगळेच हादरून गेले. वेगवेगळ्या स्तरातून यावर प्रतिक्रिया येत असताना आता अभिनेता शशांक केतकर यांने देखील आपला संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता शशांक केतकर का आणि कुणावर संतापला?
अभिनेता शशांक केतकर का आणि कुणावर संतापला?

मुंबईत अचानक आलेल्या पावसानं आणि धुळीच्या वादळानं चांगलीच भंबेरी उडवली. पहिल्याच पावसाच्या सरीमुळे मुंबईत अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्यात घाटकोपरमध्ये घडलेली दुर्घटना ही अतिशय दुःखद होती. वाऱ्यामुळे कोसळलेल्या होर्डिंग खाली चिरडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेने सगळेच हादरून गेले. वेगवेगळ्या स्तरातून यावर प्रतिक्रिया येत असताना आता अभिनेता शशांक केतकर यांने देखील आपला संताप व्यक्त केला आहे. एक व्हिडीओ शूट करत त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेबद्दल बोलताना अभिनेता शशांक केतकर चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला. शशांक केतकर याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आपला राग व्यक्त केलाय. या व्हिडीओमध्ये बोलताना शशांक म्हणाला की, ‘मुंबईमध्ये परवाच्या दिवशी एक मोठं वादळ आलं होतं. या वादळात अनेक दुर्घटना घडल्या. घाटकोपर मधील पेट्रोल पंपाच्या इथे १२०X१२०चं भलं मोठं होर्डिंग पडलं आणि त्यामुळे होर्डिंगच्या जवळपास उभ्या असलेल्या लोकांचा चिरडून मृत्यू झाला. आतापर्यंत हा मृतांचा आकडा तब्बल १४वर पोहोचलाय. हे सगळं बघून मला कोणत्याही पक्षाला किंवा एकाचा एखाद्या राजकर्त्याला दोष द्यायचा नाहीये. ही आपत्ती नैसर्गिक होती, याचा कुणाशी थेट संबंध नव्हता. पण आता आपल्या देशाची लोकसंख्या इतकी वाढत चालली आहे की, जगण्याची किंमत अगदीच शून्य झाली आहे.’

Sonali: मराठमोळ्या सोनालीला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर करणार होता प्रपोज पण...

हे सरकारचं काम नाही का?

पुढे शशांक म्हणाला की, ‘आपल्या देशात मागील अनेक वर्षात विकासाची वेगवेगळी काम सुरू आहेत. पण, अनेक गोष्टींमध्ये सुधारणा झालीच पाहिजे, असं मला वाटतं. १२०X१२० फूट उंच बोर्ड वाऱ्याने पडतो, ही अतिशय विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आता या बोर्ड प्रकरणात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षावर आरोप प्रत्यारोप सुरू देखील झाले. हा बोर्ड अनधिकृत होता का? या प्रश्नापासून ते मुंबई तितक्या मोठ्या होर्डिंगला परवानगीच नाही आणि आता या बोर्डचा मालक पळून गेलाय, असे म्हटले जात आहे. लोकसंख्या वाढत असताना लोकांसाठी रोड वाढवणे हे देखील सरकारचे काम आहे ना? याबद्दल कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला दोष देणार नाही, पण सरकारने हे काम करणं गरजेचं होतं.’

आमच्या जीवाशी खेळणं बंद करा!

‘आता जीव गेलेल्यांच्या नातेवाईकांना किंवा पालकांना पैसे देऊन काही फायदा नाही. तेच पैसे तुम्ही विकास कामात लावलेत तर बरं होईल. नशिबाने शाळा सुरू नव्हत्या. अन्यथा त्या होर्डिंगखाली एखादी शाळेच्या मुलांची बस उभी असती, तर किती लहान मुलांचा जीव गेला असता, याची कल्पनाही करवत नाहीये. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? मी एक सुजाण नागरिक म्हणून हे विचारत आहे. मी मतदान सुद्धा केले आहे. हात जोडून सांगतो की, हे होर्डिंग आणि फ्लेक्स लावून प्रदर्शन मांडणं बंद करा. त्यावर तुमच्या कार्यकर्त्यांचे आणि तुमचे चेहरे बघण्यात आम्हाला जराही रस नाही. पण, तुमच्यामुळे लोकांचे नाहक जीव जातायेत. लोकांना जगण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यांना नीट जगू द्या. तुमच्या या नाहक चढाओढीत आमचे जीव जातं आहेत, ते घेणं बंद करा. आमच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही’, असं म्हणत शशांक केतकर याने आपला राग व्यक्त केलाय.

IPL_Entry_Point