Shark Tank Season 2: नव उद्योजकांच्या पंखांना भरारी देणारा ‘शार्क टँक इंडिया’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय झाला होता. पहिला सीझन संपल्यानंतर प्रेक्षक या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट बघत होते. आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. या शोच्या नव्या सीझनचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सीझनमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत कोण दिसणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. नव्या सीझनच्या प्रोमोमध्ये पुन्हा एकदा जुन्याच परीक्षकांची झलक पाहायला मिळाली. मात्र, यात एका नव्या चेहऱ्याची देखील एन्ट्री झाली आहे.
‘शार्क टँक’चा पहिला सीझन हा स्पर्धकांसोबत परीक्षकांमुळेदेखील चांगलाच गाजला. स्पर्धकांच्या नव्या बिझनेस आयडिया आणि परीक्षकांच्या त्यावरील प्रतिक्रिया चांगल्याच गाजल्या. यातही ‘भारत पे’चे सहसंस्थापक असणारे अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांच्या संवाद शैलीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. मात्र, रिलीज झालेल्या या नव्या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर न दिसल्याने प्रेक्षकदेखील नाराज झाले आहेत.
'शार्क टँक इंडिया'च्या पहिल्या सीझनमध्ये 'भारत पे'चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी भरपूर टीआरपी कमावला होता. या शोदरम्यान ते स्वत: त्यांच्या कंपनीतल्या गोंधळामुळे प्रसिद्धी झोतात आले होते. दरम्यान त्यांच्यावरदेखील अनेक आरोप करण्यात आले होते. यानंतर मेकर्सनी त्यांना नव्या सीझनमधून ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता नव्या परीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, चाहते अश्नीर ग्रोव्हर यांना परत आणण्याची मागणी करत आहेत.
कोण कोण सांभाळणार परीक्षकांची खुर्ची?
‘शार्क टँक इंडिया’च्या सीझन 2मध्ये मागील सीझनमधील पाच परीक्षक दिसणार आहेत. यात अनुपम मित्तल (शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि सीईओ), अमन गुप्ता (बोटचे सह-संस्थापक आणि सीएमओ), नमिता थापर (कार्यकारी संचालक, एमक्योर फार्मास्युटिकल्स), विनिता सिंह (शुगर कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापिका आणि सीईओ) आणि पीयूष बन्सल (Lenskart.com चे संस्थापक आणि सीईओ) परत येत आहेत. तर, कार देखो ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांनी नवीन सीझनमध्ये अश्नीर ग्रोव्हर यांना रिप्लेस केले आहे.
संबंधित बातम्या