Sharad Ponkshe : मुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी रूमला रंगरंगोटी, प्रेक्षकांना मात्र तुटक्या खुर्च्या! शरद पोंक्षे संतापले
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sharad Ponkshe : मुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी रूमला रंगरंगोटी, प्रेक्षकांना मात्र तुटक्या खुर्च्या! शरद पोंक्षे संतापले

Sharad Ponkshe : मुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी रूमला रंगरंगोटी, प्रेक्षकांना मात्र तुटक्या खुर्च्या! शरद पोंक्षे संतापले

Jan 06, 2025 12:51 PM IST

Sharad Ponkshe Angry : कल्याणमधील अत्रे रंगमंदिराची दुरवस्था आणि त्यासंबंधी प्रशासनाची अनास्था या मुद्द्यावर ज्येष्ठ नाट्यअभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

शरद पोंक्षे
शरद पोंक्षे

Sharad Ponkshe Angry On Theater Situation : भारतीय मनोरंजन विश्वात रंगभूमीचे विशेष योगदान आहे. मात्र, सध्या नाट्यगृहांच्या अवस्था या चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक कलाकार नाट्यगृहाच्या या दुरावस्थेवर बोलताना दिसतात. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील हा मुद्दा उपस्थित करून एक प्रश्न उपस्थित केला आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदिराची दुरवस्था आणि त्यासंबंधी प्रशासनाची अनास्था या मुद्द्यावर ज्येष्ठ नाट्यअभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी व्हीव्हीआयपी कक्षाची रंगरंगोटी केली जात असताना, नाट्यगृहातील इतर भागांच्या दुरवस्थेची स्थिती अजूनही बिकट असल्याचे त्यांनी म्हटले. 

अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, रंगमंदिरातील खुर्च्या तुटलेल्या आहेत, बल्ब बंद पडले आहेत आणि नाटकाच्या चाहत्यांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था नाही. अत्रे रंगमंदिराचे आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे प्रशासन या बाबतीत दुर्लक्ष करत आहे. दोन्ही रंगमंदिरे खराब स्थितीत असून, त्यांची देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. पोंक्षे यांनी सांगितले की, प्रशासनाच्या वतीने या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही. तसेच, कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतनही दिले जात नाही.'

Bollywood Nostalgia: विवाहित राज कपूर पडले होते बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात! पत्नीला कळले अन्...

प्रेक्षकांसाठी सुविधा का नाहीत?

शनिवारी अत्रे रंगमंदिरात 'पुरुष' या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगाच्या आधी शरद पोंक्षे मेकअप रूममध्ये गेले असता, तेथे रंगकाम करणारा एक कामगार दिसला. पोंक्षे यांनी त्याला नाटकाचा प्रयोग सुरू असल्याचे सांगितल्यानंतर तो निघून गेला. यावरून पोंक्षे यांनी प्रशासनासमोर बाब मांडली की, रंगमंदिराची देखभाल केवळ मुख्यमंत्री किंवा इतर व्हीआयपी व्यक्तींच्या भेटीवर आधारित असू नये, तर नाट्यगृहाच्या सामान्य देखभालीसाठी कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्यासारख्या प्रेक्षकांसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

माझ्या बोलण्याने काही फरक पडेल?

शरद पोंक्षे यांनी प्रशासनाला सुनावले की, ‘अत्रे रंगमंदिराचे, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नाव मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानार्थ ठेवले गेले आहे. परंतु त्या नावे असेलेली रंगमंदिरे नीट ठेवण्याची जबाबदारी घेतली जात नाही. थोरामोठ्यांच्या नावाने रंगमंदिरे ठेवणे महत्त्वाचे आहे; पण त्या रंगमंदिरांचा देखभाल आणि सुधारणा करणारा व्यवस्थापन असावा लागतो.’ यावेळी शरद पोंक्षे यांनी प्रशासनाच्या मानसिकतेवरही टीका केली . माझ्या बोलण्याने काही फरक पडेल, अशी मला आशा नाही, असे ते म्हणाले. यामुळे आता नाट्यगृहाच्या दुरवस्थेची समस्या आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बनली आहे, ज्यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे.

Whats_app_banner