Shankar Mahadevan Birthday Special: ‘सूर निरागस हो...’ म्हणत अवघ्या रसिक श्रोत्यांच्या मनाला मोहिनी घालणाऱ्या शंकर महादेवन यांचा आज (३ मार्च) वाढदिवस आहे. शंकर महादेवन आज ५८व्य वर्षात पदार्पण करत आहेत. एक-दोन नव्हे तर, तब्बल ३ मिनिटे श्वास रोखून, अतिशय सुंदर गाणे गाणारे शंकर महादेवन प्रेक्षकांचेही अतिशय लाडके आहेत. ‘ब्रेथलेस’ या गाण्याने शंकर महादेवन यांना रातोरात सुपरस्टार बनवले होते. याशिवाय त्यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांसाठी त्यांना एक-दोनदा नव्हे तर, चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
असा गाण्याचा कुठलाच प्रकार नसावा, जे शंकर महादेवन यांनी गायले नाही. अगदी भक्तीगीतापासून ते आयटम साँगपर्यंत त्यांची सगळीच गाणी खूप गाजली. आयटम साँगबाबत शंकर महादेवन यांचे काम पूर्णपणे वेगळे आहे. त्यांच्या आयटम साँगमध्येही एक वेगळीच लय आहे. 'कजरारे कजरारे तेरे कारे कारे नयना' हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शंकर महादेवन यांच्या या कलेची प्रशंसा उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अमजद अली खान, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित जसराज, पंडित शिवकुमार यांनी देखील केली आहे. दिवंगत किशोरी आमोणकर यांच्यासारख्या दिग्गज गायिकेने शंकर महादेवन यांना घरी बोलावून 'माँ' हे गाणे गाण्यास सांगितले होते.
गायक-संगीतकार शंकर महादेवन यांचे सुरुवातीचे शिक्षण चेंबूर, मुंबई येथील ओएलपीएस शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. मात्र, या सगळ्यादरम्यान त्यांची संगीतातील आवड कधीच कमी झाली नाही आणि ते नेहमीच संगीताशी नाळ जोडून राहिले.
१९९८मध्ये ‘ब्रेथलेस आय’ हा त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला होता. हीच त्यांच्या करिअरची सुरुवात होती. त्यांचा हा अल्बम लोकांना खूप आवडला आणि या अल्बमच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमावले. त्यानंतर त्यांनी एहसान आणि लॉय या दोन मित्रांसह एक टीम तयार केली आणि संगीता विश्वाला एक नवा बँड मिळवून दिला. २०११मध्ये शंकर महादेवन यांनी स्वत:च्या नावाने ऑनलाइन संगीत अकादमी सुरू केली. या अकादमीच्या माध्यमातून शंकर जगभरातील विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षणही देतात.
एआर रहमानसोबत 'कंदोकंदानिन-कंदोकंदानिन' या तमिळ चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. इतकेच नाही तर, शंकर महादेवन यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार, तीन वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार आणि एकदा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. शंकर महादेवन यांनी बॉलिवूडला काही अनोखे आयटम नंबर तर दिलेच, पण त्याचसोबत त्यांनी 'तारे जमीन पर' चित्रपटातील 'माँ' हे सुंदर गाणेही गायले आहे.