Shammi Kapoor Birth Anniversary : आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध असणारे आणि आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट देणारे ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांची आज जयंती आहे. शम्मी कपूर यांना भारताचा ‘एल्विस प्रेस्ली’ देखील म्हटले जायचे. शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१मध्ये पृथ्वीराज कपूर यांच्या घरी झाला. आज जरी शम्मी कपूर आपल्यात नसले, तरी ते त्यांच्या अभिनय आणि नृत्यामुळे सगळ्यांच्या मनात जिवंत आहेत. शम्मी कपूर यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांमध्ये असल्यामुळे त्यांनाही याच क्षेत्राकडे ओढ होती. मात्र, इतरवेळी कुटुंबासोबत असणारे शम्मी कपूर, प्रेमासाठी त्यांच्या विरोधात गेले होते.
शम्मी कपूर यांच्या घरात लहानपणापासूनच फिल्मी वातावरण होते. त्यामुळेच त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये अभिनयाचे बारकावे शिकून घेतले. यानंतर त्यांनी ‘जीवन ज्योती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश केला. शम्मी कपूर यांना १९४८मध्ये ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ म्हणून पहिली नोकरी मिळाली होती. या कामाच्या बदल्यात त्यांना महिन्याला दीडशे रुपये पगार मिळत होता. यानंतर त्यांनी ‘लैला मजनू’, ‘नकाब’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘रात की रानी’ आणि ‘बसंत’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘जंगली’ हा शम्मी कपूर यांचा पहिला रंगीत चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘प्रोफेसर’, ‘राजकुमार’, ‘ब्रह्मचारी’, ‘प्रिन्स’ आणि ‘अंदाज’ यासारख्या अनेक रंगीत चित्रपटांमध्ये काम केले. शम्मी कपूर अखेरचे अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट २०११साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटांव्यतिरिक्त शम्मी कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले होते.
शम्मी कपूर यांचे पहिले लग्न ५०-६०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांच्यासोबत झाले होते. दोघांनीही घरच्यांना न सांगता हा विवाह केला होता. शम्मी कपूर यांच्या चरित्र शम्मी कपूर: द गेम चेंजरनुसार, दोघेही पहिल्यांदा १९५५ मध्ये 'मिस कोका-कोला'च्या सेटवर भेटले होते. दोघांची भेट झाली तेव्हा गीता बाली एक यशस्वी अभिनेत्री होत्या, तर शशी कपूर संघर्ष करत होते. गीता त्यांच्यापेक्षा एक वर्षाने मोठ्या होत्या, त्यामुळे त्यांना लग्नाची भीती वाटत होती. अखेर २३ ऑगस्ट १९५५ रोजी शम्मी कपूर यांनी गीता बाली यांना लग्नासाठी प्रपोज केले. गीता बाली यांनीही लग्नाला होकार दिला होता. मात्र, या नात्याला त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. गीता यांना कपूर कुटुंबाला कोणत्याही प्रकारे दुखवायचे नव्हते. त्यामुळे दोघांनी मध्यरात्री घरातून पळून जाऊन लग्न केले.
शम्मी आणि गीता लग्न करण्यासाठी मध्यरात्री बाणगंगा मंदिरात पोहोचले होते. मात्र, त्यावेळी पुजाऱ्याने विवाह करण्यास नकार दिल्याने सकाळी मंदिरात लग्नाची तयारी पूर्ण झाली. लग्नादरम्यान शम्मी कपूर सिंदूर आणायला विसरले होते. अशा वेळी काहीच सुचत नव्हते. त्यावेळी, शम्मी कपूर यांनी एक शक्कल लढवली आणि गीता बाली यांची लाल लिपस्टिक घेऊन तिचा सिंदूर म्हणून वापर केला. लग्नाच्या दहा वर्षांनी गीता बाली यांचे १९६५मध्ये एका गंभीर आजारामुळे निधन झाले.
संबंधित बातम्या