Shaktimaan Fame Actor : गेल्या काही दिवसांपासून 'शक्तिमान' या मालिकेचा सिक्वेल येणार, या कथेवर आधारित चित्रपट येणार, अशा अनेक चर्चा कानावर येत आहेत. पुन्हा एकदा 'शक्तिमान'ला पडद्यावर बघण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत. या शोने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली होती. इतकंच नाही, तर या मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. भारतातील हा पहिला सुपरहिरो 'शक्तिमान' पहिल्यांदा १३ सप्टेंबर १९९७ रोजी टीव्हीवर दिसला होता. २००५ पर्यंत हा शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत होता. या शोमधील सगळीच पात्र अजूनही लोकांच्या मनात आहते. या मालिकेतील डॉ. जैकाल तुम्हाला आठवतोय का? ही भूमिका अभिनेता ललित परिमू यांनी साकारली होती. या भूमिकेत आपल्या अभिनयाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती.
'शक्तिमान' या मालिकेत मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान'ची भूमिका केली होती. तर, याच मालिकेत डॉक्टर जैकाल हे खलनायकी पात्र देखील होते. डॉक्टर जैकालची भूमिका अभिनेते ललित परिमू यांनी उत्तमरित्या साकार केली होती. सम्राट किलविश व्यतिरिक्त डॉक्टर जैकालनेच शक्तिमानला सगळ्यात जास्त अडचणीत आणले होते. जगातील महान शास्त्रज्ञ म्हणवणारा डॉक्टर जैकाल हा शक्तिमानच्या शत्रूंपैकी एक होता आणि अभिनेते ललित परिमू हीच डॉक्टर जैकालची भूमिका साकारून खूप लोकप्रिय झाले. 'शक्तिमान'ला ऑफ एअर होऊन अनेक वर्षं उलटून गेली आहेत, पण आजकाल डॉक्टर जैकाल म्हणजेच अभिनेते ललित परिमू कुठे आहेत आणि ते काय करत आहेत याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही.
डॉक्टर जैकाल शक्तिमानवर त्याचे विचित्र प्रयोग करून पाहत असे. त्यामुळे त्याला अनेकदा पराभवालाही सामोरे जावे लागले होते. मात्र, शक्तिमान बंद झाल्यानंतर डॉ.जैकाल म्हणजेच अभिनेते ललित परिमू कुठे गायब झाले, याची माहिती फार कमी लोकांना आहे. वाढत्या वयामुळे ललित यांनी चित्रपटात काम करणे पूर्णपणे बंद केले आहे. सध्या ते स्वतःची अभिनय अकादमी चालवतात. २०२०मध्ये ते 'कंचली' या चित्रपटात दिसले आणि त्यानंतर ते पुन्हा पडद्यावर दिसले नाहीत. ललित सध्या पडद्यापासून आणि अभिनयापासून दूर असले, तरी ते अभिनय अकादमी चालवून आपला छंद आणि कौशल्ये जिवंत ठेवत आहेत.
अभिनेते ललित परिमू हे एक हुशार लेखक देखील आहेत.त्यांनी 'मैं मन हूँ'सारखी पुस्तक लिहिले आहे. ललित आता क्वचितच टीव्हीवर दिसतात. ते कोरोनाच्या काळात गंभीर आजारी पडले होते आणि त्यांची प्रकृती बरी होण्यासाठी बराच वेळ लागला होता.
संबंधित बातम्या