Shaitaan Box Office Collection Day 3: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांचा नुकताच रिलीज झालेला 'शैतान' हा चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘शैतान’ हा चित्रपट ८ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दिवशी शानदार ओपनिंगनंतर 'शैतान'ने वीकेंडला देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'शैतान'ने पहिल्या दिवशी १४.७५ कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाला वीकेंडचा पुरेपूर फायदा झाला आणि चित्रपटाने १८.७५ कोटींची कमाई केली. आता तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे अंदाजे आकडे समोर आले असून, हा चित्रपट चांगला व्यवसाय करत असल्याचे दिसून आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'शैतान'ने रविवार बॉक्स कलेक्शनमध्ये १९.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. याचाच अर्थ या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा गाठला आहे.
'शैतान'ने तीन दिवसांत अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण ५०.८५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या कलेक्शनसह अजय देवगणने त्याच्या 'भोला' चित्रपटाला मागे टाकले आहे. अजय देवगणचा 'भोला' हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तीन दिवसांत ३०.८० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, 'शैतान' या चित्रपटाने ५०.८५ कोटींची कमाई केली आहे.
अजय देवगण स्टारर 'शैतान' या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलने केले आहे. अजय देवगणने स्वतः या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात आर माधवन 'शैतान' अवतारात दिसला आहे. जानकी बोडीवालाने अजय देवगणच्या मुलीची आणि ज्योतिका त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली आहे. ‘शैतान’ या चित्रपट जबरदस्त सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, नेटकरी देखील त्याचे कौतुक करत आहेत. ‘शैतान’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटातून साऊथ अभिनेत्री ज्योतिकाने २५ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे.