छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' ही मालिका जवळपास गेली १४ वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील तारक मेहता, जेठालाल, दयाबेन, पोपटलाल, बबिता या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत तारक मेहता हे पात्र अभिनेते शैलेश लोढा यांनी साकारले होते. आज १५ जुलै रोजी शैलेश लोढा यांचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
शैलेश एक अभिनेता आहेत. त्याच बरोबर एक कवी आणि लेखक देखील आहेत. शैलेश लोढा हे स्वत: प्रसिद्ध कवी असून गेली ४२ वर्षे ते साहित्य क्षेत्रात मुशाफिरी करत आहेत. उत्तम कवी असलेल्या शैलेश यांच्याकडं विनोदाचं अंग आहे. मालिकेने त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. पण काही दिवसांपूर्वीच शैलेश लोढाने मालिका सोडली.
शैलेश यांच्या जन्म राजस्थानमधील जोधपुर येथे १५ जुलै १९६९ साली झाला. त्यांच्या आईला पुस्तके वाचण्याची आवड होती. त्यामुळे शैलेश यांना लहानपणापासून पुस्तके वाचण्याची सवय लागली होती. तसेच वयाच्या ९व्या वर्षी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडल्यावर शैलेश 'वाह भाई वाह' या कार्यक्रमात दिसले होते. शैलेश लोढा यांच्या बरोबरच आणखी तीन कवींचा कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे तिघे मिळून प्रेक्षकांना हसवत होते. विनोदी कवितेतून दैनंदिन जीवनातील घडामोडींवर भाष्य व वास्तव मांडताने ते दिसले होते.
शैलेश यांनी स्वाती लोढाशी लग्न केले. त्या एक लेखिका आहेत. मॅनेजमेंटशी संबंधीत विषयावर त्या सतत लिहिताना दिसतात. त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. शैलेश यांनी देखील चार पुस्तके लिहिली आहेत. त्यामधील ‘दिलजले का फेसबुक स्टेटस’ हे पुस्तक चर्चेत होते.
वाचा: दीपिका पादूकोणला मिठी मारताच ऐश्वर्याचे डोळे का पाणावले? नेमकं काय झालय?
शैलेश यांना लग्झरी गाड्यांचा शौक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यात ऑडी आणि मर्सिडीजसारख्या महागाड्या गाड्यांचा देखील समावेश आहे. शैलेश लोढा हे कॉमेडी सर्कस या शोमध्ये देखील दिसले होते. तसेच त्यांनी कॉमेडी दंगल, अजब गजब घर जमाई, और वाह वाह क्या बात है या मालिकांमध्येही काम केले.