बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगनला पान मसाल्याची जाहिरात करणे महागात पडले आहे. पुन्हा एकदा पान मसाल्याची जाहिरात हे प्रकरण चर्चेत आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने आता आपले उत्तर दिले आहे. पान मसाला जाहिरात प्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला दिली आहे.
पान मसाला जाहिरात या प्रकरणात केंद्र सरकारच्या वकिलांचे म्हणणे आहे की, सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ९ मे २०२४ रोजी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने अवमान याचिकेवर हा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
वाचा: 'तुम्हे आईने की जरुरत नही', अमृता फडणवीसांचे नवे गाणे ऐकलेत का?
पान मसाल्याचे प्रमोशन करणारे अभिनेते शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण या तिघांनाही सिनेसृष्टीमधील कामगिरीसाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे हे पाऊल तरुणांसाठी योग्य नाही, असे मत याचिका दाखल करणारे वकील मोतीलाल यादव यांनी व्यक्त केले. या कलाकारांमुळे लोकांचा भ्रमनिरास होत आहे. ऑगस्ट २०२३मध्ये, हायकोर्टाने या याचिकेला प्रतिसाद न दिल्यामुळे कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना अवमान नोटीस जारी करण्यात आली आहे.