बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी मुंबईतील वरळी परिसरातील ‘ओबेरॉय ३६० वेस्ट’ या प्रकल्पात याब्बळ ५९ कोटी रुपये देऊन लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. IndexTap.com या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार, या आलिशान लक्झरी अपार्टमेंटमध्ये ५,३९५ चौरस फुटांचे रेरा कार्पेट असून त्यात पार्किंगच्या तीन जागा आहेत. २४ मे २०२४ रोजी 58.66 कोटी रुपयांच्या मालमत्ता व्यवहाराची नोंदणी करण्यात आली होती.
ओबेरॉय रियल्टीने बांधलेल्या उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर हा फ्लॅट आहे आणि कपूर दाम्पत्याने चांडक रियॅल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून तो खरेदी केला आहे. चांडक रियल्टीने फेब्रुवारी २०२३ मध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता. याच इमारतीमध्ये डी मार्टचे मालक राधाकिशन दमानी यांचे कुटुंबीय आणि जवळच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षी १,२३८ कोटी रुपयांना २८ फ्लॅट खरेदी केले होते. तर, चांडक रियॅल्टर्सने फेब्रुवारी २०२३मध्ये ३५.३१ कोटी रुपयांना खरेदी केलेला हा फ्लॅट कपूर दाम्पत्याला विकला आहे.
चांडक रियॅल्टी कंपनीने सुमारे ६५ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने हा फ्लॅट खरेदी केला होता. तर, आता तो एक लाख रुपये प्रति चौरस फूट दराने विकण्यात आला आहे. एका वर्षाच्या कालावधीत हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे,' असे एका रिअल इस्टेट सल्लागाराने नाव न सांगण्याच्या अटीवर एचटी डिजिटलला सांगितले.
‘३६० वेस्ट बाय ओबेरॉय रियॅल्टी’ हा एक असा प्रकल्प आहे, ज्यामध्ये पेंटहाऊससह ४ बीएचके, ५ बीएचके आणि डुप्लेक्स अपार्टमेंटसह दोन टॉवर बांधण्यात आले आहेत. सी-व्ह्यू असल्यामुळेच बहुदा या प्रकल्पाला हे नाव देण्यात आले असावे. या इमारतींची उंची ३६० मीटर आहे आणि सर्व अपार्टमेंट पश्चिमाभिमुख आहेत. हा एक रेडी टू मूव्ह लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्ट आहे.
या व्यवहारासाठी कपूर दाम्पत्याने तब्बल १.७५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. २०१८मध्ये शाहिद कपूरने याच इमारतीत ८२८१ चौरस फुटांचा फ्लॅट ५५.६० कोटी रुपयांना खरेदी केला होता आणि २.९१ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली होती. आता पुन्हा एकदा शाहिद कपूर आणि मीरा कपूर एका आलिशान घराचे मालक झाले आहेत.