Veer-Zaara re-release Box Office: प्रसिद्ध दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा 'वीर-झारा' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. हा रोमँटिक चित्रपट आता २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित होताच जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाची कमाई पाहाता सर्वजण चकीत झाले आहेत. या चित्रपटाने नव्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देखील टक्कर दिली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर 'वीर-झारा' चित्रपटाच्या कमाईबाबत माहिती दिली आहे. 'वीर-झाराने शुक्रवारी (१३ सप्टेंबर) २० लाख, शनिवारी ३२ लाख, रविवारी ३८ लाख, सोमवारी २० लाख, मंगळवारी १८ लाख, बुधवारी १५ लाख आणि गुरुवारी १४ लाख रुपयांची कमाई केली. त्यात पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर परदेशात कमावलेले ०.२३ कोटी रुपये. चित्रपटाने सप्टेंबर महिन्यात पुन्हा प्रदर्शित होताच कमावले १.८० कोटी रुपये. यापूर्वी चित्रपटाने फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाने ०.३० कोटी रुपयांची कमाई केली होती' या आशयाचे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे.
'वीर-झारा' चित्रपटाने देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर अनुक्रमे ६१ कोटी आणि ३७ कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच २००५ ते २०२३ या कालावधीत २.५० कोटी रुपयांची कमाई केली. दोन्ही रिरिलीज कलेक्शन जोडल्यानंतर आता या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०२.६० कोटींची कमाई केली आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त म्हणजेच २० सप्टेंबररोजी चित्रपटगृहात ९९ रुपयांत तिकिटे दिली जात असल्याने या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली.
यशराज फिल्म्स या बॅनरने तयार केलेला वीर-झारा हा चित्रपट शाहरुख सोबतचा तिसरा सिनेमा होता. यापूर्वी 'डर' (१९९१) आणि 'दिल तो पागल है' (१९९७) या चित्रपटांसाठी त्यांनी एकत्र काम केले होते. या वीर-झारा या चित्रपटात प्रीती, राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, मनोज वाजपेयी, बोमन इराणी, किरण खेर, अनुपम खेर आणि दिव्या दत्ता यांच्याही भूमिका होत्या.
वाचा: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर झोपले अन्...; जाणून घ्या महेश भट्ट यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं
'वीर-झारा' या चित्रपटात एक भारतीय सैनिक आणि पाकिस्तानी महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. दोघेही दिवंगत आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले असतात. दोघांची भेट होते आणि ते ऐकमेकांच्या प्रेमात पडतात. पण हेरगिरी केल्याचा आरोप करत शाहरुखला तुरुंगात टाकले जाते. त्यामुळे दोघेही विभक्त होतात. नंतर राणी मुखर्जी शाहरुखला तुरुंगातून बाहेर काढण्यास मदत करते.