Shah Rukh Khan Viral Video: बॉलिवूडच्या किंग खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३मध्ये 'पठान' चित्रपटातून ४ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या शाहरुख खानने आता आणखी एक कामगिरी केली आहे. स्वित्झर्लंडमधील ७७व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखला ‘करिअर अचिव्हमेंट’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. शाहरुखने यापूर्वी 'पठान', 'जवान' आणि 'डंकी'सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखने चित्रपट महोत्सवात आपल्या भाषणाने लोकांची मने जिंकली. त्याचवेळी या कार्यक्रमाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून आता जगभरातील लोक शाहरुखवर टीका करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये शाहरुख खान एका वृद्धाला धक्काबुक्की करताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ७७व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सोलो पोज देण्याआधी शाहरुख खान एका वृद्ध व्यक्तीला त्याच्या दोन्ही हातांनी मागे ढकलताना दिसला आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हलके हसूही पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेटकरी संतापले आहेत.
या व्हिडीओमध्ये शाहरुख खान खूप मजेच्या मूडमध्ये दिसत आहे. मात्र, नेटिझन्सना शाहरुखचे हे वागणे पसंत पडलेले नाही. एका यूजरने शाहरुखचा हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करत लिहिले की, ‘शाहरुख खानने एका वृद्धाला धक्काबुक्की केली. शाहरुखला लाज वाटली पाहिजे.’ यांनतर वापरकर्त्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत अक्षरशः प्रतिक्रियांचा पूर आणला आहे.
एका यूजरने लिहिले की, ‘मला माहित आहे की तो चांगला माणूस नाही, तो फक्त ढोंग करतो.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘मी शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे आणि ही कृती पाहून मी खरोखर निराश झालो आहे. मला माहित नाही पण ही नाण्याची एक बाजू दिसत आहे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘हे सत्य आहे. मला कळत नाही की लोक डोळे मिटून चाहते का होतात?’
अभिनेता शाहरुख खान हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे, ज्याला ‘पार्डो अल्ला कॅरीरा’ अर्थात करिअर लेपर्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. लोकार्नोच्या पियाझा ग्रांडे येथे ८००० लोकांसमोर भाषण करताना शाहरुख खान याने लोकांना खूप हसवले. शाहरुखने महोत्सवाच्या ठिकाणाचे कौतुक केले. तो म्हणाला की, लोकार्नो हे अतिशय सुंदर, अतिशय सांस्कृतिक, अतिशय कलात्मक शहर आहे.