Shah Rukh Khan Viral Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या अलिबाग फार्महाऊसवर कुटुंबासमवेत सुट्टी घालवून मुंबईत परतला आहे. अभिनेता शाहरुख खान, आज गौरी खान, मुलगी सुहाना, अबरामसोबत मुंबईत परतताना दिसला. यावेळी कुटुंबात एक नवीन सदस्यही आल्याचे पाहायला मिळाले आहे. या नव्या पाहुण्याला खुद्द किंग खानने आपल्या हातात उचलून घेतले होते. हा नवा सदस्य म्हणजे त्यांच्या घराचा पाळीव श्वान. बोटीतून उतरल्यानंतर शाहरुख लगेच आपल्या लाडक्या पिल्लाला हातात घेऊन गाडीत जाऊन बसला. पापाराझी आणि चाहत्यांपासून स्वतःला लपवून ठेवण्यासाठी शाहरुख खानने लांब काळ्या रंगाच्या जॅकेटने स्वत:ला झाकून घेतलं होतं.
चाहत्यांनी सोशल मीडियावर शाहरुख आणि त्याच्या पाळीव कुत्र्याच्या फोटोंचा पाऊस पाडला आहे. सोशल मीडियावर कमेंट करताना अनेक युजर्सनी त्यांना खूप क्यूट म्हटले आहे. सुहानाचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता अगस्त्य नंदाही यावेळी तिच्यासोबत दिसला. ब्लॅक टी-शर्ट, ब्लू डेनिम आणि ब्लॅक कॅपमध्ये तो खूपच मस्त दिसत होता. सुहाना ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू डेनिम परिधान करताना दिसली. तिने अगस्त्यसोबत काळी टोपी घालून ट्वीनिंग केली होती. मात्र, सुहाना दुसऱ्या गाडीत बसून घराकडे निघाली. किंग खानच्या चाहत्यांनी एक्सवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत, जे तुफान व्हायरल होत आहेत.
शाहरुख खान दरवर्षी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आपल्या कुटुंबाला वेळ देतो. ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी अभिनेता आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना अलिबागमधील फार्महाऊसवर घेऊन गेला होता. मात्र, आर्यन खान या फॅमिली टाइममध्ये दिसला नाही. अनेकांनी आर्यन कुठे आहे, असा सवाल देखील केला. मात्र, आर्यन लवकरच एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने, तो त्या कामात व्यस्त असावा, असे म्हटले जात आहे.
'पठान' आणि 'जवान'च्या यशानंतर अभिनेता शाहरुख खान सुजॉय घोषच्या 'किंग' चित्रपटात मुलगी सुहानासोबत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता ग्रे शेड भूमिकेमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात शाहरुख सुहानाच्या व्यक्तिरेखेला प्रशिक्षण देताना दिसणार आहे. तर, दुसरीकडे आर्यन खानही दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आर्यनने ‘स्टारडम’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, जो थिएटरमध्ये नाही तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या