बॉलिवूडचा कॉमेडियन सुनील पाल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सुनील पाल त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. प्रत्येक मुद्द्यावर आपल्या परखड वक्तव्य करण्याच्या स्वभावामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, सुनील पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुनीलने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याने शाहरुख खानचा एक किस्सा सांगताना म्हटले की, किंग खान त्याच्या स्टाफमधील एका कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी झोपडपट्टीत यायचा.
बॉलिवूड बबलशी बोलताना एका खास संवादात सुनील पाल यांनी त्या काळच्या आठवणी सांगितल्या, जेव्हा तो शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत काम करत असे. या दरम्यान सुनील पालला अनेकदा शाहरुख आणि आमिरसोबत टूरवर देखील जावे लागायचे. अशाच एका वेळेची आठवण सांगताना सुनील म्हणाला, 'मी सिंगापूरला गेलो होतो, तिथे मोरानी ब्रदर्सने मला २०००० रुपये दिले. एका स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि मला आठवते कार्यक्रमानंतर शाहरुखने माझी प्रेक्षकांशी ओळख करून दिली. त्या कार्यक्रमात गणेश हेगडे देखील उपस्थित होता, ज्याने मला ग्रीन रुममध्ये येऊन शाहरुखसमोर परफॉर्म करण्यास सांगितले होते. हातात ड्रिंक आणि सिगारेट घेऊन शाहरुख रूममध्ये आला आणि मी त्याच्या समोर त्याचे प्रसिद्ध डायलॉग्स कॉपी करू लागलो होतो. या दौऱ्यात शाहरुखचा मुलगा आर्यन खानही त्याच्यासोबत उपस्थित होता. आर्यन त्यावेळी खूपच लहान होता.’
अजूनही शाहरुख खानच्या संपर्कात आहे का? या प्रश्नावर सुनील पाल म्हणाला की, 'मी आता फारसा शाहरुखच्या संपर्कात नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो. पण मला वाटतं जेव्हाही आम्ही भेटू, त्यांनी मला ओळखले किंवा नाही ओळखले, तरी त्यांची वागणूक आधीसारखीच असेल. शाहरुख खानच्या बाबतीत, मला आणखी एक गोष्ट आठवते की, त्याचा स्टाफमधील एक कर्मचारी माझ्या शेजारच्या झोपडपट्टीत राहत होता. ४-६ महिन्यातून एकदा खास प्रसंगी शाहरुख खान स्वतः त्याला भेटायला यायचा. पण, तो रात्री उशिरा शांतपणे यायचा, १०-१५ मिनिटे त्याच्या घरी घालवायचा आणि मग निघून जायचा.’