Shah Rukh Khan Struggle Journey : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पहिल्याच चित्रपटाने यश मिळवल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. पण हेही खरे आहे की बॉलिवूडचा मेगा सुपरस्टार होण्यापूर्वी त्याने टीव्ही इंडस्ट्रीत खूप काम केले. शाहरुख खानलाही संघर्षाच्या काळातून जावं लागलं होतं. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान किंग खानने त्याच्या संघर्षाच्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. शाहरुख खान म्हणाला की, त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा तो खूप अस्वस्थ व्हायचा आणि स्वतःला बाथरूममध्ये बंद करून रडायचा.
सध्या शाहरुख खान दुबईच्या दौऱ्यावर आहे. शाहरुख ग्लोबल फ्रेट समिटचा भाग होण्यासाठी येथे आला असून, या विशेष कार्यक्रमादरम्यान त्याच्याशी अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. यादरम्यान अभिनेत्याच्या स्टारडम आणि संघर्षाचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यावर शाहरुख खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शाहरुख खान म्हणाला की, ‘मला यावर जास्त बोलायला आवडत नाही. संघर्षाच्या दिवसांत मी स्वतःला कसे हाताळले हे मला माहीत आहे. मी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून रडायचो. माझ्या आयुष्यात काय चालले आहे आणि मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हे मी बाहेर कधीच कोणाला दाखवले नाही. आयुष्यात चढ-उतार येतात, पण त्या परिस्थितीत तुम्हाला सकारात्मक राहावे लागते. तुमचा चित्रपट चालत नसेल, तर त्यात कोणतेही षडयंत्र नाही. आपण काहीतरी चुकीचे केले आहे किंवा आपली निवड योग्य नाही, हे मान्य करावे लागेल. जीवनात निराशाजनक क्षण येतात, परंतु असे काही क्षण देखील असतात जेव्हा तुम्ही फक्त शांत राहून पुढे जाण्याचा विचार करता. कारण जग तुमच्या विरोधात नाही, तुम्ही नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे.’
अशातच शाहरुख खानने जीवनातील अपयश आणि संघर्ष या विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसताना देखील इंडस्ट्री गाजवणाऱ्या शाहरुखच्या स्टारडमशी कोणीही बरोबरी करू शकत नाही.
गेल्या वर्षी तीन चित्रपटांतून बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवणारा शाहरुख खान यंदा एकाही चित्रपटात दिसला नाही. पण पुढच्या वर्षी त्याचा ‘किंग’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, ज्यामध्ये त्याची मुलगी सुहाना खान देखील अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.