आयपीएलच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यानंतर अभिनेता शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स या आपल्या संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना पार पडला. अभिनेता आणि त्याचे कुटुंबीय - पत्नी गौरी खान, मुले आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान आणि मित्रांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत. केकेआरने सामना जिंकल्यानंतर शाहरुखने गौरी खानला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कपाळावर चुंबनही घेतले. यावेळी या जोडप्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
त्यानंतर शाहरुख खानने आपली मॅनेजर पूजा ददलानीला मिठी मारली. त्यानंतर शाहरुखने आपल्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच मिठी मारली. केकेआरच्या विजयाचा आनंद या सगळ्यांनीच जल्लोषात साजरा केला.
गौरीने शाहरुखसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तिने आणि शाहरुखने आयपीएल ट्रॉफीसोबत पोज दिल्या आहेत. दोघेही कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहेत. तिने या पोस्टला कॅप्शन दिले की, ‘विजेते @kkriders’
या दरम्यान चाहत्यांनी २०१२ आणि २०२४मधील शाहरुख आणि गौरीचे फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांनी एक्सवर शाहरुख आणि गौरीचे २०१२ मधील विजयाचे आणि आताचे फोटो शेअर केले आहेत. एक्स युजर @TeamSRKWarriors लिहिले की, ‘आजच्या जगात, जिथे विभक्त होणे इतके सोपे आहे, तिथे कुणाच्या तरी आयुष्यात टिकून राहणे महत्त्वाचे! राजा आणि राणीने आपल्या संपूर्ण प्रवासात आपल्याला हेच दाखवून दिले आहे. खरोखरच ते आम्हाला रिलेशनशिप गोल्स देत आहेत.’
सामना संपल्यानंतर शाहरुखने आपल्या संघातील खेळाडूंची भेट घेतली आणि आयपीएल फायनल जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. एका व्हिडिओमध्ये हर्षित राणा शाहरुखला मिठी मारताना आणि उत्साहाने त्यालावर उचलताना दिसला आहे. आयपीएलच्या अधिकृत पेजने शेअर केलेल्या फोटोंमध्ये शाहरुख गौतम गंभीरच्या कपाळावर चुंबन घेताना दिसला आहे.
केकेआरने अंतिम सामन्यात एसआरएचविरुद्ध प्रभावी अष्टपैलू कामगिरी करत केकेआरला आयपीएल २०२४चे विजेतेपद मिळवून दिले. याच मैदानावर २०१२मध्ये केकेआरने पहिले विजेतेपद पटकावले होते आणि २६ मे २०२४ रोजी त्यांनी तिसरी ट्रॉफी जिंकली.
शाहरुखला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाहरुखला उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर उपचारही झाले आणि तो लगेच बरा होऊन टीमसाठी मैदानातही आला. अहमदाबादमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे तो आजारी पडला होता. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.