Shah Rukh Khan Crazy Fan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा स्वतःचा वेगळा आणि मोठा चाहतावर्ग आहे. किंग खानचे चाहते अक्षरशः त्याचे वेडे आहेत. जेव्हा अभिनेता त्याच्या घराच्या बाल्कनीत येतो, तेव्हा लाखो चाहते किंग खानच्या घराच्या खाली उभे असतात. यावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. मात्र, त्याचे असे काही चाहते आहेत, जे अभिनेत्याच्या प्रेमात प्रत्येक मर्यादा ओलांडण्यास तयार असतात. स्वतः शाहरुख खान याने त्याच्या एका क्रेझी चाहत्याचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे.
एका मुलाखतीत शाहरुख खानने स्वत: त्याच्या एका चाहत्यांच्या वेडेपणाबद्दल सांगितले होते. किंग खानने सांगितले की, ‘असे बरेच चाहते आहेत जे खूप वेगवेगळ्या प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करत असतात. जर मी तुम्हाला काही किस्से सांगितले तर, तुमचा विश्वास बसणार नाही. कारण, अनेकदा मी स्वतः देखील आश्चर्यचकित झालो होतो. शाहरुख खानने सांगितले की, एकदा मुलाखत किंवा वाढदिवसाची पार्टी होता आणि सर्वजण पत्रकारांसोबत बसले होते. त्यावेळी त्याचा एक चाहताही त्यांच्यासोबत शांतपणे आत आला.
किंग खान म्हणाला की, ‘तो चाहता आत आला. त्याने आपले कपडे काढले आणि नंतर आमच्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि पूर्ण अंघोळ केली. त्याने सोबत एक टॉवेलही आणला होता. अंघोळ करून, अंग पुसून त्याने कपडे वैगरे बदलले. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला विचारले की, तो इथे काय करतोय, तेव्हा त्याने आपण काहीही करत नसल्याचे म्हटले. शाहरुख खान ज्या पाण्यात अंघोळ करतो, त्या पाण्यात मी ही आंघोळ करायला आलो होतो. आता मी त्या पाण्यात आंघोळ करून निघतो आहे.’
शाहरुख म्हणाला, मलाही जरा गंमत वाटली. सिक्युरिटीने त्या व्यक्तीला पकडून ठेवले होते आणि मला फोन करून सगळा घडला प्रकार सांगितला. तर मी म्हणालो की, त्याला थांबव मी भेटायला येतो. कारण मला वाटले की, तो खूप विचित्र चाहता आहे. यावर त्या चाहत्याने उत्तर दिलं की, मला भेटायचं नाहीये, माझ्यासोबत फार फ्रेंडली होऊ नका. मी फक्त पाण्यात आंघोळ करायला आलो होतो, मी आंघोळ केली आहे, मी निघतोय आणि असं बोलून तो निघून गेला.’ शाहरुख खानने ही गोष्ट रजत शर्माच्या शोमध्ये सर्वांना सांगितली होती. शाहरुख खानही त्याच्या चाहत्यांच्या या कृतींनी हैराण झाला आहे. सोशल मीडियापासून ते रिअल लाईफपर्यंत सगळ्यांनाच किंग खान खूप आवडतो.