Shah Rukh Khan 59th Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान यावर्षी त्याचा ५९वा वाढदिवस साजरा करत आहे. आज म्हणजेच २ नोव्हेंबरला किंग खानचा वाढदिवस आहे आणि या खास प्रसंगी ‘मन्नत’ या त्याच्या बंगल्यावर एक भव्य सोहळा होणार असल्याची बातमी समोर आली आहे. तसं बघायला गेलं, तर शाहरुख खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही, त्याचे केवळ नावच पुरेसे आहे. पण तुम्हाला माहित आहे का की ज्या सुपरस्टारला जग शाहरुख खान या नावाने ओळखते, त्याचे खरे नाव काय आहे?
बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानचे पूर्वी वेगळे नाव होते. हे नाव त्याला त्याच्या आजीने दिले होते. परंतु, ते नाव कुठेही नोंदवले गेले नाही आणि नंतर बदलण्यात आले. याचा खुलासा खुद्द शाहरुख खानने अनुपम खेर शोच्या एका एपिसोडमध्ये केला होता. कार्यक्रमादरम्यान अनुपम खेर यांनी शाहरुखला विचारले होते की, तू अब्दुल रहमान नावाच्या कुणाला ओळखतोस का?
अनुपम खेर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खानने सांगितले होते की, आधी त्यांचे नाव शाहरुख नसून अब्दुल रहमान होते. शाहरुख म्हणाला होता की, ‘मी अशा किंत्याही व्यक्तीला ओळखत नाही. माझी आजी होती, आम्ही तिला पिश्नी म्हणायचो. तिने लहानपणी माझे नाव अब्दुल रहमान ठेवले होते. त्याची कुठेही नोंद नव्हती, पण तिला माझे नाव अब्दुल रहमान ठेवायचे होते. आता तुम्हीच विचार करा, या नव्या जमान्यात अब्दुल रहमान अभिनीत ‘बाजीगर’ असं म्हणनं चांगलं कसं दिसलं असतं... या ऐवजी चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत शाहरुख खान, कसं ऐकायला बरं वाटतं…’
अनुपम खेर यांनी पुढे विचारले की मग नाव बदलण्याचे कारण काय?, ज्यावर शाहरुख खान म्हणाला की, 'माझ्या वडिलांनी माझे नाव बदलले. त्यांनी माझ्या बहिणीचे नाव लाला रुख ठेवले जे एका मोठ्या कवितेवर आधारित आहे. याशिवाय’ त्यांच्याकडे एक आहे. त्या घोड्याचे नाव देखील लाला रुख आहे. त्यावेळी वडिलांना घोडे पाळण्याचा खूप मोठा छंद होता. मुलीचे नाव लाला रुख असावे आणि माझे नाव शाहरुख असावे, असे त्यांना वाटत होते. शाहरुख या नावाचा अर्थ आहे, सुंदर चेहऱ्याचा राकुमार!’
शाहरुख खान शेवटचा ‘डंकी’ या चित्रपटात दिसला होता. आता तो मुलगी सुहाना खानसोबत 'द किंग' चित्रपटाची तयारी करत आहे. त्याच्या या चित्रपटाची देखील प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे.