Rocky Aur Rani Ki Prem Kahani Kissing Scene: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनमुळे चांगलाच गदारोळ मजला आहे. या सीनवर करण जोहर आणि धर्मेंद्र यांनी आधीच आपली प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता शबाना आझमी देखील या किसिंग सीनवर खुलेपणाने बोलल्या आहेत. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट स्टारर या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी आपल्या लिप-लॉकने सर्वांनाच धक्का दिला होता. या चित्रपटात शबानाने धर्मेंद्रच्या माजी प्रेयसीची भूमिका केली आहे, जी त्यांना अनेक वर्षांनी भेटते.
धर्मेंद्र आणि शबाना हे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांचे कलाकार मानले जातात. एकीकडे धर्मेंद्र हे व्यावसायिक चित्रपटांचे सुपरस्टार असताना, दुसरीकडे शबाना यांनी समांतर चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. इतकी वर्षे इंडस्ट्रीत सक्रिय असूनही, या दोन कलाकारांना एकत्र आणण्याचा प्रयोग फार कमी चित्रपट निर्मात्यांनी केला. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाआधी देखील ते एकत्र झळकले आहेत.
बासू चॅटर्जी यांच्या ‘स्वामी’ या चित्रपटात शबाना आझमी आणि गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची निर्मिती हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती यांनी केली होती. धर्मेंद्र आणि हेमा यांनी स्वामीमध्ये कॅमिओ केला होता. या चित्रपटातील सीक्वेंसमध्ये शबाना आणि धर्मेंद्र डान्स करताना दिसले होते. तर, अर्जुन हिंगोरानी यांच्या 'खेल खिलाडी का' या चित्रपटात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी मुख्य भूमिकेत होते. शबाना आझमी देखील या चित्रपटाचा एक भाग होत्या. ‘मर्दों वाली बात’ या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांची रोमँटिक जोडी सगळ्यांनाच आवडली होती. ‘मर्दों वाली बात’मध्ये धर्मेंद्रसोबत संजय दत्त मुख्य भूमिकेत होता.
नुकत्याच आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात शबाना आणि धर्मेंद्र यांनी किसिंग सीन केला आहे. एका मुलाखतीत या किसिंग सीनवर आपली प्रतिक्रिया देताना शबाना आझमी म्हणाल्या की, जेव्हा आम्ही किस करत होतो, तेव्हा सेटवर लोक आनंदाने जल्लोष करत होते. शुटिंग दरम्यानही काहीच समस्या आली नाही. मी याआधी पडद्यावर फारशी चुंबन दृश्य केलेली नाहीत हे खरे आहे. पण, धर्मेंद्रसारख्या देखण्या माणसाचे चुंबन घ्यायला कोणाला आवडणार नाही?
याआधी एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी शबानासोबतच्या किसिंग सीनबद्दल सांगितले होते. या सीनवर बोलताना धर्मेंद्र म्हणाले होते की, ‘माझ्याही कानावर आलं की, शबाना आणि माझ्या किसिंग सीनने प्रेक्षक हैराण झाले होते. मला वाटते की, लोकांना याची अपेक्षा नव्हती, म्हणूनच त्याचा जास्त प्रभाव पडला. गेल्या वेळी मी लाईफ इन अ मेट्रोमध्ये नफीसा अलीसोबत एक किसिंग सीन केला होता आणि त्यावेळी लोकांना तो खूप आवडला होता.’
संबंधित बातम्या