बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या येत्या काळात हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांच्या 'हॅलो' या वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. त्याची शूटिंगही सुरू झालेली आहे. त्यामुळे त्यांनी त्याची शूटिंग आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासंदर्भात त्यांचं मत मांडलं आहे. पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या शबाना यांनी दिग्दर्शक जॉन स्लेसिंगर यांच्या 'मँडम सौसत्ज़का', रोलँड जोफच्या 'सिटी ऑफ जॉय' आणि 'सन ऑफ द पिंक पँथर' यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांत काम केलेलं आहे.
यासंदर्भात त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की 'प्रत्येक कलाकार हा विशिष्ट चौकटीतच अभिनय करण्यासाठी सिमीत राहु शकत नाही, तो जगातील प्रत्येक विषयावर आणि क्षेत्रात काम करु इच्छित आहे, त्वचेचा रंग आणि जातधर्म यापलीकडे जाऊन चित्रपट होत असतील तर हे स्वागतार्ह आहे त्यामुळे कलाकार कोणत्याही चित्रपटात काम करु शकतात'.
आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याविषयी शबाना म्हणाल्या की 'हॉलिवूड किंवा पश्चिमी देशांच्या चित्रपटात आशियाई कलाकारांना काम मिळवण्यासाठी फार धडपड आणि संघर्ष करावा लागतो, मलाही खूप मेहनत करावी लागली, तब्बल ३४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मला हॉलिवूडमध्ये काम मिळालं होतं', असं त्यांनी सांगितलं आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक लॉरेंस ओलिवियर यांचं उदाहरण देताना त्या पुढे म्हणाल्या की 'जर ते १९६५ मधील 'ओथेलो' मध्ये भूमिका करु शकतात तर इतर कलाकारांसाठी काहीही अशक्य नाहीये जर यूरोपीयन आणि अमेरिकन कलाकार जातधर्म विसरून चित्रपट करु शकतात तर भारतीय आणि चीनी कलाकारांसाठीही ते शक्य आहे'.
दरम्यान भारतातील बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अनेक भारतीय अभिनेत्रींनी हॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे. त्यात प्रामुख्याने प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या