बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शबाना आझमी. सध्या त्या चित्रपटांपासून लांब असल्या तरी सामाजिक विषयांवर बिनधास्त पणे त्यांचे मत मांडताना दिसतात. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण शबाना आझमी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतात. आज १८ सप्टेंबर रोजी शबाना आझमी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
शबाना आझमी यांनी १९७४ साली प्रदर्शित झालेल्या 'अंकुर' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांनी आजवर १२० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये हिंदी आणि बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी राष्ट्रीय चित्रपटांप्रमाणेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून भूमिका वठविल्या आहेत. जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’ आणि ‘गॉडमदर’ या चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांची प्रत्येक भूमिका त्यावेळी हिट ठरत होती. त्यांनी काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यात जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का’ आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी ऑफ जॉय’ या चित्रपटांचा समावेश आहे.
शबाना आझमी यांच्या आई शौकत आझमी याही एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी 'उमराव जान' आणि 'सलाम बॉम्बे' या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटात काम केल्यानंतर शौकत यांनी 'कैफ अँड आय मेमोयर' हे आत्मचरित्र लिहिले. त्यामध्ये अनेक थक्क करणारे खुलासे केले. शबाना हा कॉफी विकायच्या आणि त्यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे देखील सांगितले. 'सीनियर केंब्रिजमध्ये फर्स्ट डिव्हिजन उत्तीर्ण झाल्यानंतर शबाना यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तीन महिने पेट्रोल पंपवर ब्रू कॉफी विकली. यातून त्या दिवसाला ३० रुपये कमावायच्या. तिने मला याबद्दल कधीच सांगितले नाही. मी रीहर्सलमध्ये व्यस्त होते त्यामुळे मला काहीच समजले नाही. एके दिवशी तिने माझ्यासमोर पैसे आणले आणि ठवले. मग मी तिला त्याबद्दल विचारले. तेव्हा तिने मला ३ महिने पेट्रोल पंपवर पैसे कसे कमावले याबद्दल सांगितले.'
वाचा: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक
शबाना आझमी यांनी लेखक जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले आहे. शबाना यांच्या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. पण त्यांनी कोणाचाही विचार न करता लग्न केले. शबाना या अभिनय करण्याबरोबर सामाजिक आणि स्त्रियांच्या अधिकाराच्या चळवळीतदेखील सक्रिय असतात. या व्यतिरिक्त त्यांना डॉक्टरेट ही पदवीदेखील मिळाली आहे.