ओटीटीवर पुन्हा एकदा मोठा ‘स्कॅम’ होणार आहे. आतापर्यंत दोन वेगवेगळे घोटाळे वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता यातच आणखी एक नवा घोटाळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्कॅम १९९२: हर्षद मेहता स्टोरी’, ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ या दोन सीरिजनंतर आता तिसरी वेब सीरिज रिलीज होणार आहे. ‘स्कॅम २०१०: सुब्रत रॉय सागा’ असे या सीरिजचे नाव असून, ही नवीकोरी स्कॅम सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतीच निर्माते हंसल मेहता यांनी या नव्या सीरिजची घोषणा केली आहे. निर्माते हंसल मेहता यांनी सोशल मीडिया पोस्टमधून तिसऱ्या भागाचा नवा विषय सांगितला आहे.
'स्कॅम १९९२: हर्षद मेहता स्टोरी'' हा पहिला भाग हर्षद मेहताबद्दल होता. हर्षद मेहता आणि इतर स्टॉक ब्रोकर्सचा सहभाग असलेल्या १९९२च्या भारतीय शेअर बाजार घोटाळ्याचे वार्तांकन यात करण्यात आले होते. पत्रकार सुचेता दलाल आणि देबाशीष बसू यांच्या 'द स्कॅम : हू वॉन, हू लॉस्ट, हू गॉट अवे' या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे. यात प्रतीक गांधीच्या ‘हर्षद मेहता’ या भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. या ओटीटी सीरिजची थीम म्युझिक प्रचंड लोकप्रिय झाली होती. हंसल मेहता आणि जय मेहता यांनी या वेब सीरिजचे सहदिग्दर्शन केले होते.
स्कॅम सीरिजचा 'स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी' हा दुसरा भाग २०००च्या दशकाच्या सुरुवातीला अब्दुल करीम तेलगीच्या बनावटी स्टॅम्प पेपरच्या कथेवर आधारित होता. संजय सिंह यांच्या ‘तेलगी घोटाळा : रिपोर्टर्स की डायरी’ या पुस्तकावर ही सीरीज आधारित आहे. या सीरिजमध्ये गगन देव रियार यांच्या ‘अब्दुल करीम तेलगी’च्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या ओटीटी सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता मुकेश तिवारी, भावना बलसावर, अमन वर्मा आणि इरावती हर्षे यांच्याही भूमिका आहेत.
आता या स्कॅम सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘स्कॅम २०१०: सुब्रत रॉय सागा’ या नव्या वेब सीरिजमध्ये सहारा इंडिया परिवार गुंतवणूकदार घोटाळा प्रकरणाचा समावेश असणार आहे. यात सहाराच्या दोन कंपन्यांनी ओएफसीडीद्वारे बेकायदेशीर निधी गोळा केला आहे, ज्याला सेबीने अनधिकृत मानले आहे.
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, ही वेब सीरिज तमाल बंद्योपाध्याय यांच्या ‘सहारा : द अनटोल्ड स्टोरी ’ या पुस्तकावर आधारित असेल. 'स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा' या सीरिजमध्ये कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.