मराठीसह साऊथ मनोरंजन विश्व गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. साताऱ्यातील रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. छातीत त्रास जाणू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतर, त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर, सयाजी शिंदे यांच्या तब्येतीबद्दल कळतात त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर ही हृदयशस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टर सोमनाथ साबळे यांनी ही शस्त्रक्रिया केली असून, सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, ‘सयाजी शिंदे यांना काही दिवसांपासून अस्वस्थ असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काही रुटीन चेकअप करून घेतल्या. त्यादरम्यान इसीजी तपासणीमध्ये त्यांना काही बदल जाणवले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल मंदावल्याचे जाणवलं होतं. यानंतर डॉक्टरांनी स्ट्रेस करण्याची करण्याचा निर्णय घेतला आणि एक स्ट्रेस टेस्टमध्ये काही दोष सापडले.’
यानंतर, सयाजी शिंदे यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. कामात व्यस्त असलेल्या सयाजी शिंदे यांना दोन-तीन दिवसांपूर्वी एक शूट रद्द झाल्यामुळे सुट्टी मिळाली होती. यादरम्यान ते साताऱ्यात आले आणि त्यांनी अँजिओग्राफी करून घेतली. या तपासणी त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या व्यवस्थित होत्या, तर उजव्या बाजूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ९९ टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळले. सयाजी शिंदे यांनी अत्यंत सकारात्मकतेने या सगळ्या गोष्टी हाताळल्या. हृदयविकाराचा झटका येण्याआधी त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेत, तातडीने अँजिओप्लास्टी करून घेतली.
आता त्यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. अभिनेते सयाजी शिंदे हे त्यांच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतातच, मात्र त्यांच्या सामाजिक कार्यामुळेदेखील ते चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. चित्रीकरणासह काहीही सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने ते अवघ्या महाराष्ट्रभर फिरत असतात. प्रत्येक कामात ते स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. मात्र, हे सगळं करत असतानाच त्यांनी त्यांच्या शरीरात होणारे हे बदल वेळीच ओळखले आणि तातडीने योग्य ते उपचार घेऊन संभाव्य आजारावर मात केली.